जीवन म्हटले म्हणजे अडचणी आणि संकटे हे येणारच. परंतु या संकट आणि अडचणी पुढे झुकून न जाता मोठ्या धैर्याने त्यामधून मार्ग काढत जो व्यक्ती चालत राहतो तो आयुष्यात यशस्वी होतो. परंतु काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये अशाप्रकारे धक्के येतात की ते पचवणे देखील कठीण जाते किंवा काही अडचणींना तोंड द्यायला देखील खूप मोठ्या प्रमाणावर धाडस लागते.
अशाप्रसंगी बरेच जण डिप्रेशनमध्ये जातात किंवा जीवनाच्या प्रत्येक आघाडीवर अपयशी व्हायला लागतात. परंतु जर आपण नाशिक जिल्ह्यात असलेल्या मातोरी येथील संगीता पिंगळे या यशस्वी असलेल्या शेतकरी महिलेचे उदाहरण घेतले तर ते अनेकांना प्रेरणादायी असेच आहे.
2000 यावर्षी लग्न आणि 2007 मध्ये दुर्दैवाने झालेले पतीचे निधन यामुळे खचून न जाता धैर्याने वाटचाल करत सगळी जबाबदारी अंगावर घेत कुटुंबियांना आधार दिला व वाट्याला आलेल्या 13 एकर शेती मधून स्वतःचे साम्राज्य उभे केले. त्यामुळे या लेखात आपण त्यांची यशोगाथा बघणार आहोत.
पतीच्या निधनानंतर संगीता ताईंनी उभे केले शेतीत स्वतःचे साम्राज्य
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यात मातोरी या गावच्या संगीता यांचे 2000 यावर्षी अनिल पिंगळे यांच्याशी विवाह झाला व सासरी शेतीचे क्षेत्र जास्त असल्यामुळे शेतामध्ये कुठल्याही पद्धतीचे काम करण्याची गरज भासलीच नाही. विशेष म्हणजे केमिस्ट्रीमध्ये पदवीधर असलेल्या संगीता ताई यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील सुरू केलेला होता.
परंतु लग्न झाल्यामुळे या परीक्षांचा अभ्यास मध्येच त्यांना सोडावा लागला व संसाराकडे लक्ष देणे गरजेचे असल्याने ते काम त्यांनी केले. 2001 मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले व 2004 यावर्षी पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु जन्माला आलेले हे बाळ जन्मजात अपंग असल्यामुळे पाच वर्षे व्यवस्थित सांभाळ करून देखील त्याचे दुर्दैवाने निधन झाले.
हा धक्का त्यांनी कसाबसा पचवला व 2007 यावर्षी मात्र त्यांना मोठा धक्का बसला व त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर मात्र खचून न जाता त्यांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारायचे ठरवले व एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे 2016 ला कुटुंब विभक्त झाल्याने त्यांच्या वाट्याला 13 एकर जमीन आली व या जमिनीत त्यांनी शेती करायला सुरुवात केली.
कधीही शेतीमध्ये काम न केलेले संगीता ताईंनी मात्र आता पूर्ण वेळ शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली व सुरुवातीला येणाऱ्या अडचणींवर खंबीरपणे मात करत दहा एकर क्षेत्रावर द्राक्ष आणि तीन एकरवर टोमॅटो शेती सुरू केली व आज देखील त्याच पद्धतीची शेती ते करतात.
तीन एकरमधील टोमॅटोचे पीक निघाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न त्या मिळतात. विशेष म्हणजे ते शेतात पिकवलेल्या द्राक्षांची निर्यात देखील करतात. द्राक्ष निर्यातीमध्ये सुधाकर नावाच्या वाणाची निर्यात केली जाते.
त्यांनी द्राक्षात रेड ग्रुप तसेच अनुष्का, वाईन, आरा 36, एसएसएन द्राक्ष वानांची लागवड केली असून यातील वाईनचा जो काही माल आहे तो नाशिक मधील प्रसिद्ध असलेल्या सुला वाईनला दिला जातो व बाकीचा माल बाजारपेठेत विक्रीला पाठवतात.
व्यवस्थितपणे शेतीचे उत्तम नियोजन त्यांनी केले असून स्वतःच्या कर्तुत्वातून सगळ्यात जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आज स्वतःचे साम्राज्य शेती मधून उभे करून लाखो रुपयांची कमाई वर्षाला ते करतात.
अशा पद्धतीने संगीता ताईंच्या उदाहरणावरून दिसून येते की जीवनात कितीही संकटे आली तरी पुढे चालत राहणे गरजेचे असते व प्रत्येक अडचणींना धैर्याने तोंड देऊन मार्ग काढणे देखील तितकेच गरजेचे असते व तेव्हा कुठे यश मिळत असते.