स्पेशल

भारतीय संशोधकांचे भन्नाट संशोधन ! विकसित केला असा ड्रोन ज्याने शेती होणार अजूनच सुलभ ; वाचा ‘या’ ड्रोनच्या विशेषता

Published by
Ajay Patil

Agriculture Drone : भारतीय शेतीत काळानुरूप मोठा बदल झाला आहे. पूर्वी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती मात्र आता यंत्रांच्या साह्याने शेती होऊ लागली आहे. भारतीय शेतीत आता नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. यामध्ये ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे. आता बाजारात असे काही ड्रोन आले आहेत ज्याच्या सहाय्याने काही मिनिटातच फवारणीची कामे करता येणे शक्य बनले आहे.

दरम्यान आता एका भारतीय कृषी विद्यापीठातील संशोधकांनी असाच एक ड्रोन तयार केला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. बीएचयू इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस या विद्यापीठातील भारतीय शास्त्रज्ञांनी हा नवीन अद्ययावत असा नवीन कृषी ड्रोन बनवला आहे.

एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार बीएचयुच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेला हा कृषी ड्रोन मात्र 15 मिनिटात एक एकर शेत जमिनीवर उभ्या असलेल्या पिकावर फवारणी करण्यास सक्षम राहणार आहे. निश्चितचं यामुळे शेतकऱ्यांचा अनमोल असा वेळ वाचणार आहे. शिवाय ड्रोनच्या साह्याने फवारणी केल्यास कीटकनाशकांचा तसेच विद्राव्य खतांचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी मदत होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल. ड्रोन च्या साह्याने फवारणी केल्यास योग्य पद्धतीने पिकांवर कीटकनाशक तसेच रासायनिक विद्राव्य खते फवारले जातील यामुळे जमिनीवर कमी प्रमाणात कीटकनाशक आणि रासायनिक औषध पडणार आहे. यामुळे रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे जमिनीचा होणारा ऱ्हास कमी होईल परिणामी जमीन नापीक होण्याची भीती दूर होईल. म्हणजेच जमिनीचे आरोग्य अबाधित राहील.

शिवाय आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पाठ पंपाच्या साह्याने किंवा मग डिझेलपंपाच्या साह्याने फवारणी करावी लागत होते, अशा पद्धतीने फवारणी करताना शेतकरी बांधव कीटकनाशक युरिया किंवा इतर रासायनिक औषधांच्या संपर्कात येत होते. यामुळे मानवाचे आरोग्य धोक्यात सापडत होते. परंतु जर ड्रोनच्या साह्याने फवारणी केली तर कीटकनाशक किंवा इतर तत्सम औषधांच्या संपर्कात शेतकरी येणार नाही यामुळे मानवाचे आरोग्य देखील धोक्यात सापडणार नाही.

असा असेल हा कृषी ड्रोन

बीएचयूच्या इन्स्टिट्यूट ऑफ अग्रिकल्चर सायन्सेस या संस्थेने विकसित केलेले हे नवीन कृषी ड्रोन दहा लाख रुपयात तयार झाले आहे. या कृषी ड्रोन मध्ये मल्टी सेन्सर उपयोगात आणले गेले आहेत. यामध्ये कॅमेरे देखील बसवले आहेत. यामुळे पिकाची योग्य माहिती घेऊन ड्रोनच्या साह्याने अचूक ठिकाणी फवारणी होणार आहे. दरम्यान शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या नवीन ड्रोनची चाचणी पार पडली आहे. या ड्रोनच्या साह्याने 500 मिली नॅनो लिक्विड युरिया एक एकर गहू पिकावर फवारण्यात आला आहे. यासाठी मात्र 15 मिनिटांचा कालावधी लागला आहे. निश्चितच हे ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आगामी काही दिवसात वरदान सिद्ध होणार आहे.

Ajay Patil