Agriculture News : भारतात काळाच्या ओघात शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय शेती हायटेक बनू पाहत आहे. फायदेशीर असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण शोध, वेगवेगळी यंत्रे संशोधकांच्या माध्यमातून विकसित केली जात आहेत.
दरम्यान आता पुण्याच्या मूळ रहिवासी असलेल्या दोन मित्रांनी अमेरिकेत शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट संशोधन करून एक असा रोबोट तयार केला आहे ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. चिन्मय सोनम आणि अमोल गिजरे नामक दोन नवयुवकांनी अमेरिकेत जाऊन सलग चार वर्षे अथक परिश्रम घेऊन एक रोबोट तयार केला आहे.
हा रोबोट पिकाची पाहणी करणारां असून याच्या मदतीने पिकाला कोणता रोग लागला आहे हे समजते. एवढेच नाही तर पिकाचा रंग, उंची आणि पीक वाढीस कोणकोणत्या अन्नद्रव्य, खतांची गरज आहे याचे देखील विश्लेषण या रोबोच्या माध्यमातून केल जात. या रोबोटमध्ये असं काही सॉफ्टवेअर विकसित करण्यात आला आहे जे पीक वाढीसाठी शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
यां रोबोमध्ये ठिकठिकाणी स्वयंचलित कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याच कॅमेऱ्यांच्या साह्याने पिकाचे चित्रण करून पिकाची उंची, रंग, जाडी याच्यासह पिकावर कोणत्या कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे हे या रोगामध्ये बसवण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजणार आहे.
सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहितीचे अचूकरीत्या विश्लेषण केलं जात आणि मग हा रोबोट पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अशी आगाऊ माहिती शेतकऱ्यांना देण्यास सक्षम बनतो. यामुळे शेतकऱ्यांना रोगाचा प्रादुर्भाव समजतो तसेच पीक वाढीसाठी कोणते अन्नद्रव्य पिकाला आवश्यक आहेत या बाबींची देखील त्याला माहिती समजते.
परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत होत असते. या रोबोटला अमेरिकेतील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान आता हा रोबोट आपल्या महाराष्ट्रात देखील दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील माणदेशी फाउंडेशनच्या वतीने हा रोबो तालुक्यात आणला गेला आहे. म्हसवडजवळच्या ढोकमोढा येथील शेतात या रोबोटचे प्रात्यक्षिक आयोजित झाले होते.या ठिकाणी डाळिंब, मका, ज्वारी आदी पिकांच्या पाहणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा अमेरिकेत विकसित झालेला रोबोट डाळिंब, मका, ज्वारी आणि बाजरी या चार पिकांसाठी बनवण्यात आला आहे. निश्चितच या भन्नाट रोबोमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.