Agriculture News : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून एक असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर बाजारात दरवर्षी बनावट खतांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. बनावट खतामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते.
बनावट खतांमुळे शेतकऱ्यांच्या पैशांचे तर नुकसान होतेच शिवाय पिकाचे देखील नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातून खत खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही.
दरम्यान आज आपण शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या डीएपी आणि युरिया खत बनावट आहे की नाही हे कसे तपासायचे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
युरिया : खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये दरवर्षी बनावट युरिया मोठ्या प्रमाणात आढळतो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. दरम्यान बनावट युरिया कसा ओळखायचा याबाबत कृषी तज्ञांनी माहिती दिली आहे.
कृषी तज्ञ सांगतात की, युरियाची खरी ओळख म्हणजे त्याचे समान आकाराचे पांढरे चमकदार कडक दाणे. तसेच ते पाण्यात पूर्णपणे विरघळते आणि द्रावणाला स्पर्श केल्यावर थंड वाटते. कढईवर युरिया गरम केल्याने त्यातील दाणे वितळतात.
अर्थातच युरिया बनावट आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही युरिया पाण्यात टाकला पाहिजे. युरिया पाण्यात टाकल्यानंतर तो विरघळला आणि ते पाणी थंड लागले तर युरिया ओरिजनल आहे असे समजावे.
मात्र असे झाले नाही तर युरिया बनावट असू शकतो. तसेच युरिया तव्यावर किंवा कढईवर गरम केल्यानंतर त्याचे दाणे वितळले नाहीत तर तो युरिया बनावट असू शकतो.
डीएपी : डीएपी ओरिजनल आहे की बनावट हे चेक करण्यासाठी याचे काही दाणे हातात घेऊन त्यामध्ये चुना मिसळून तंबाखूप्रमाणे चोळा जर त्यातून तीव्र वास आला तर डीएपी ओरिजनल आहे असे समजावे.
पण जर त्यातून तीव्र वास आला नाही तर हे खत बनावट असू शकते. तसेच, जर तुम्ही डीएपीचे काही दाणे तव्यावर गरम केले तर हे दाणे फुगले तर समजून घ्या की हे खरे डीएपी आहे.
शिवाय, याचे कडक दाणे तपकिरी, काळे व बदाम रंगाचे असतात जे की नखांनी सहज तुटत नाहीत. जर डीएपी नखाने सहज तुटला तर तो बनावट असू शकतो.