Ahilyanagar News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सहा दिवस उलटलेत. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलाय. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून यामुळे महाविकास आघाडी कडून निवडणुकीच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएम वर शंका उपस्थित केली आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत, स्वतः उद्धव ठाकरे, तसेच शरद पवार गटाचे रोहित पवार, शरद पवार, काँग्रेसकडून नाना पटोले यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी ईव्हीएम वर शंका उपस्थित केली आहे.
अशातच भारतीय जनता पक्षाच्या गोट्यातून देखील ईव्हीएमवर शँका उपस्थित होऊ लागली आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले उमेदवार माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज सादर केला असून यासाठी लाखो रुपयांचे शुल्क निवडणूक आयोगाकडे जमा केले आहे.
राम शिंदे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि अगदीच विश्वासू आहेत. राम शिंदे यांचा पराभव शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केलाय. या मतदारसंघात रोहित पवार हे 1243 मतांनी विजयी झाले आहेत.
भाजपचे राम शिंदे यांनी म्हणूनचं फेरमतमोजणीची मागणी केली असून यासाठी ८ लाख २४०० रुपयांचा शुल्क भरलेला आहे. याशिवाय जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन पराभूत उमेदवारांनीही लाखो रुपयांचे शुल्क भरून पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे यांनी मतदारसंघातील १७ बुथवरील पडताळणीची मागणी केली आहे.
भाजपचे राम शिंदे यांच्यासोबतच राहुरीचे शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार संदीप वर्पे, पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या पराभूत उमेदवार राणी लंके यांनी सुद्धा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील फेर मतमोजणीसाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या उमेदवारांच्या मागणीप्रमाणे फेरमतमोजणी झाल्यानंतर नेमका काय निकाल लागेल याकडे साऱ्या नगर जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.