Ahilyanagar News : गेल्या काही दिवसांपासून देश पातळीवर वक्फ कायद्यावरून वाद सुरू आहेत. केंद्रातील सरकार या कायद्यात सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसते.
अशातच मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मौजे गुहा येथील श्री कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर भूमीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकला आहे.
बोर्ड आणि मंदिर संस्थान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. आता हा वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की, ही भूमी एका दर्ग्याच्या मालकीची असून वर्ष २००५ मध्ये वक्फ कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली होती.
अर्थातच वक्फ बोर्डाने ही जमीन वक्फच्या मालकीचा असल्याचा दावा केला असून यामुळे नवनाथांच्या भक्तांमध्ये रोष वाढत आहे. याप्रकरणात कानिफनाथ मंदिर ट्रस्टने मोठी माहिती दिलेली आहे.
मंदिर ट्रस्टचे असे म्हणणे आहे की, ब्रिटीश काळापूर्वीच्या या भूमीची मालकी सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे ऐतिहासिक कागदपत्रे आहेत. पण, नवनाथांपैकी एक कानिफनाथ महाराजांचे मंदिर पाडून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न चालू असता आता हा वाद आणखी चिघळत चालला आहे.
भाविकांनी ही जमीन कानिफनाथ मंदिराचीचं आहे असा दावा केला आहे. सध्या हे प्रकरण वक्फ न्यायाधिकरणाकडे पाठवण्यात आलय. दरम्यान वक्फ न्यायाधिकरणाने कानिफनाथ मंदिराच्या रचनेत कोणताही पालट न करण्याचा आदेश दिलाय.
यासमवेत १९ मंदिर ट्रस्ट आणि ग्रामपंचायत सदस्यांना या ठिकाणी येण्यापासून रोखण्यात आलय. कानिफनाथ मंदिराचे विश्वस्त श्रीहरि आंबेकर यांनी या जमिनी बद्दल माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितले की, ही भूमी पूर्वी शंकर भाई यांच्या पत्नी बिबन यांना सेवेसाठी दिली होती. यानंतर वर्ष २००५ मध्ये काही स्थानिक मुसलमान रहिवाशांनी वक्फ कायद्याच्या प्रक्रियेचा अपवापर करून ही भूमी वक्फच्या नावावर नोंदवली होती.
पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी मंदिराच्या विश्वस्तांना नोंदणीची माहिती देण्यात आली नव्हती. त्या वेळीही ही भूमी कानिफनाथ देवस्थानाची असून तुम्ही केवळ व्यवस्थापक आहात,
यावर तुमचा कोणताही अधिकार नाही, असे निरीक्षण राहुरी जिल्हा न्यायालयाने नोंदवले होते. दरम्यान या प्रकरणांमुळे नाथ भक्तांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संतापाची लाट असून यावर काय निकाल लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.