Ahmednagar Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ही बातमी जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. खरंतर कापूस आणि सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची शेती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात होते.
याशिवाय मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात याची लागवड पाहायला मिळते. या दोन्ही पिकांवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र, गतवर्षी अर्थातच 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादनात मोठी घट आली. शिवाय बाजारात अपेक्षित असा दरही मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता आला नाही. म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पिकासाठी अनुदान द्यावे अशी मागणी लावून धरली होती.
याचं मागणीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी अर्थातच 2023 मध्ये उत्पादित झालेल्या सोयाबीन आणि कापूस पिकाला अनुदान देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला.
कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये एवढे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान दिले जाईल.
म्हणजेच एका पात्र शेतकऱ्याला कमाल दहा हजाराचे अनुदान मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी 20 गुंठ्यापेक्षा कमी जमिनीवर लागवड केली असेल त्यांना किमान एक हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे.
याच योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान दिले जाणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 68.12 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी १०७.१२ कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे शासनाकडून मंजूर झालेली ही रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.