स्पेशल

अहमदनगरच्या सहाणे बंधूंचा नादखुळा ! फुलशेतीने खोलले यशाचे कवाड; झेंडू लागवडीतून मात्र 2 महिन्यात मिळवले 6 लाखांचे उत्पन्न, अख्ख्या नगरमध्ये रंगली या प्रयोगाचीं चर्चा

Published by
Ajay Patil

Ahmednagar Farmer Success Story : अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. सहकार क्षेत्रात जिल्ह्याला नवीन ओळख मिळवून दिली. सहकार क्षेत्रात केलेली कामगिरी जिल्ह्यातील विकासासाठी मोलाची ठरली असून या कामगिरीमध्ये शेतकऱ्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान अलीकडील काही वर्षात शेतकरी बांधवांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळंपण देखील सिद्ध केल आहे.

अशाच एका नवीन आणि हटके प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या मौजे कुरकुटवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने लाखो रुपयांची कमाई करत सर्वांना आपल्या प्रयोगाची भुरळ घातली आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यातील शेतकरी कांदा, कापूस यांसारख्या अन्य पारंपारिक आणि नगदी पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करतात. याशिवाय जिल्ह्यातील शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे देखील आकृष्ट झाले असून यातून चांगली कमाई करत आहेत.

अशातच मौजे कुरकुटवाडी येथील ज्ञानेश्वर आणि निवृत्ती बाळकृष्ण सहाने या दोन शेतकरी बंधूंनी कमी शेत जमीन असताना देखील फुल शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. अनेकदा शेतकऱ्यांकडून तक्रार केली जाते की अल्पभूधारक शेतकरी कमी जमिनीमुळे अपेक्षित असा उत्पन्न मिळू शकत नाही. मात्र जर क्षेत्र कमी जरी असलं पण त्याला नवनवीन प्रयोगाची जोड दिली तर कमी क्षेत्रात लाखोंची कमाई केली जाऊ शकते हेच सहाने बंधूंनी दाखवून दिले आहे. सहाणे बंधूनी आपल्या तीन एकर शेत जमिनीत फुल शेतीचा निर्णय घेतला.

निश्चितच फुलशेती सुरु करणे हेच एक आव्हानात्मक काम होते. वास्तविक, इतर पारंपारिक पिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होते मात्र फुलांना त्या तुलनेने बाजारपेठ शोधणे थोडे जिकरीचे काम आहे. ही जोखीम माहिती असताना सुद्धा या शेतकरी बंधूंनी शेतीमध्ये काहीतरी हटके प्रयोग करायचा, आपलं वेगळं पण सिद्ध करायचं म्हणून झेंडूच्या अप्सरा येलो या जातीची तीन एकरात लागवड केली. सध्या स्थितीला झेंडूच्या पिकातून त्यांना उत्पादन मिळत असून 75 ते 80 रुपये प्रति किलो असा भाव त्यांच्या फुलांना मिळत आहे. विशेष म्हणजे, झेंडूच्या शेतीतून त्यांनी मात्र दोन महिन्यात दहा टक्के विक्रमी उत्पादन कमावले आहे.

यामुळे त्यांना तब्बल सहा लाखांची कमाई झाली आहे. सहाणे बंधू यांना वडीलोपार्जित चार एकर जमीन आहे. या जमिनीत ते आपल्या कुटुंबासमवेत कायमच वेगवेगळे प्रयोग करत राहतात. ज्ञानेश्वर सहाने त्यांच्या अर्धांगिनी ज्योती सहाने आणि त्यांचे बंधू निवृत्ती सहाने आणि निवृत्तीरावांची धर्मपत्नी निशिगंधा सहाने यांनी नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत. त्यांनी भाजीपाला आणि हंगामी पिकांची शेती देखील केली असून दोडका, कलिंगड, टोमॅटो यांसारख्या अल्प कालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न कमवत पंचक्रोशीत प्रयोगशील शेतकरी कुटुंब म्हणून ख्याती प्राप्त केली आहे.

दरम्यान सहाने बंधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबर रोजी त्यांनी आपल्या चार एकर शेत जमिनीपैकी तीन एकर जमिनीत झेंडूची लागवड केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा म्हणून त्यांनी तीन एकरात मल्चिंग पेपर अंथरून झेंडूच्या सुधारित वाणाची निवड करून त्याची लागवड केली. त्यांनी अप्सरा यलो या झेंडू वाणाची लागवड केली आहे. लागवड केल्यानंतर त्यांनी पीक वाढीसाठी फिश ऑइल आणि जीवामृत चा वापर केला. यामुळे पीक चांगले जोमदार बहरले.

मध्यंतरी पिकावर कीटकाचा प्रादुर्भाव जाणवला मात्र याकडे वेळेतच लक्ष घातले असल्याने अल्पशा कीटकनाशकाची फवारणी करून त्यांना यावर नियंत्रण मिळवता आले. योग्य नियोजन अन आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केल्याने त्यांना मात्र 37 दिवसात झेंडू पिकातून उत्पादन मिळू लागले. या तीन एकरासाठी त्यांना तब्बल अडीच लाख रुपयांचा खर्च आला असून दहा टन त्यांना उत्पादन मिळाले असून सहा लाखांचे उत्पन्न हाती आले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झेंडू पिकातून पहिल्या तोडणी मधून 600 किलो झेंडूचे उत्पादन मिळाले अन 50 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. यानंतर दुसऱ्या तोडणी मधून 1330 किलो उत्पादन मिळाले अन चाळीस रुपयाचा दर मिळाला. तिसऱ्या तोडणीत 1235 किलो उत्पादन अन चाळीस रुपये किलोचा दर लाभला. यानंतर चौथ्या तोडणीत 1650 किलोचे उत्पादन मिळालं अन 53 रुपये दर मिळू शकला. पाचव्या तोडणीत मात्र त्यांना सर्वाधिक उत्पादन मिळालं, यावेळी त्यांना 2800 किलोचे उत्पादन मिळाले आणि दरदेखील 80 रुपये किलोचा मिळाला. आणि शेवटच्या तोडणीला त्यांना दोन हजार किलोचे उत्पादन मिळाले आणि 75 रुपये प्रति किलो प्रमाणे फुलांची विक्री झाली. अशा पद्धतीने तीन एकरात त्यांना दहा टन उत्पादन मिळाले आणि एकूण सहा लाखांची कमाई झाली.

सहाणे बंधू सांगतात की, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक संपूर्ण जगात वाढू लागला. भारतातही या आजाराचे सावट पुन्हा एकदा पाहावयास मिळाले होते. परिणामी अनेकांनी फुल लागवडीकडे दुर्लक्ष केले. बाजारपेठा बंद राहतील म्हणून विक्रीस अडचण येईल म्हणून अनेकांनी हा निर्णय घेतला. मात्र त्यांनी जोखीम पत्करलं आणि बाजारात अधिकचा दर मिळू शकला. बाजारात लागवड मुळातच कमी असल्याने फुलांची आवक कमी होती परिणामी त्यांना अधिक दर मिळाला. निश्चितच सहाणे बंधूनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.

अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेतीमध्ये काही राम उरला नाही, शेती केल्याने आर्थिक प्रगती साधता येणार नाही, शेतीमध्ये नेहमीच तोटा सहन करावा लागतो, शेतीसाठी केलेला खर्च देखील निघत नाही असं म्हणत शेती करण्यापासून दुरावत चालले आहेत तर दुसरीकडे सहाने बंधूसारखे प्रयोगशील शेतकरी कमी शेत जमिनीत सुयोग्य नियोजन आखत अल्पकालावधीमध्ये लाखो रुपयांची कमाई करत एक नवीन पायंडा घालून इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनत आहेत. एकंदरीत सहाने बंधूं कडून प्रेरणा घेऊन नवयुवक शेतकरी पुत्रांनी शेतीमध्ये त्यांच्याप्रमाणे नियोजन आणि नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे.

Ajay Patil