Ahmednagar News : नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिला वहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महिला विद्यार्थी शेतकरी कर्मचारी यांसारख्या विविध घटकातील नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा देखील करण्यात आली आहे.
ही योजना जरी पूर्वीपासूनच लागू असली तरी देखील या योजनेत या नवीन घोषणेनुसार अमलाग्र बदल पहावयास मिळत आहेत.
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाच्या रकमेत आता वाढ करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तब्बल 98 हजाराचा लाभ देणे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान आज आपण या योजनेचे स्वरूप आणि पात्रता यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.लेक लाडकी योजनेचे स्वरूप
या योजनेअंतर्गत राज्य शासनाचे मुलींचा जन्मदर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. मुलींचा जन्मदर वाढवावा, मुलींच्या शिक्षणाचा रेशो वाढावा या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील म्हणजेच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक पालकांच्या मुलींचा जन्म झाल्यानंतर 5 हजार रुपये, मुलगी चौथीत गेल्यानंतर 4000, मुलगी सहावीत गेल्यानंतर 6000, तसेच मुलगी अकरावीत गेल्यानंतर 8000 आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच मुलगी जन्माला आल्यापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत मुलीला 98 हजार रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील इतक्या कुटुंबांना होणार लाभ
ही योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 10 लाख 45 हजार पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे. खरं पाहता जिल्ह्यात एकूण 31 लाख रेशन कार्डधारक आहेत. यापैकी दहा लाख 45 हजार पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत.
निश्चितच या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो कुटुंबांतील मुलींना लाभ मिळणार असून यामुळे मुलींच्या शिक्षणात भरभराट होणार आहे. मुलींच्या जन्मासाठी यामुळे प्रोत्साहन दिले जाणार असून मुलीचा जन्मदर वाढण्यास मदत होईल, स्त्री साक्षरता यामुळे वाढेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.