Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा शेतीमध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी कायमच चर्चेत असतो. जिल्ह्यातील शेतकरी बांधव आपल्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अशा प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करत असतात. दरम्यान आज आपण जिल्ह्यातील शेतीशी संबंधित अशाच एका प्रयोगाविषयी जाणून घेणार आहोत.
जिल्ह्यातील सुप्रिया भुजबळ या शिक्षिकेने शेतात आपल्या संकल्पनेने रिसॉर्ट उभारून एक निसर्गरम्य अशा पिकनिक पॉईंटची निर्मिती केली आहे. भुजबळ पेशाने शिक्षिका होत्या मात्र त्यांचे नोकरीत काही मन लागेना. खरं पाहता त्यांना सुरुवातीपासूनच व्यवसायात अधिक रस होता. यामुळे नोकरीमध्ये त्यांचं मन लागत नव्हतं परिणामी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
नोकरीं सोडल्यानंतर त्यांना पिकनिक पॉईंट उभारण्याची कल्पना सुचली. या अनुषंगाने त्यांनी मुळा नदीच्या मागच्या बाजूला शेती विकत घेतली. सुरुवातीला या ठिकाणी केवळ शेती केली जाऊ लागली. यामध्ये भाजीपाला तसेच फळ पिकांची लागवड झाली. डोंगराळ भागात वसलेली ही शेती दिसायला अतिशय निसर्गरम्य, मनमोहक असल्याने लोक तेथे येऊ लागले.
शेती पाहायला लोक येऊ लागले यामुळे त्यांनी नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी बोटीची व्यवस्था केली. इथूनच खरा पिकनिक पॉईंटचा हा प्रवास सुरू झाला. बोटी झाल्या नंतर गार्डन तयार झालं, गार्डन नंतर लहान मुलांसाठी खेळणी, गेम त्या ठिकाणी तयार करण्यात आले.
मग भुजबळ यांनी याला व्यवसायाचे स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. पर्यटकांसाठी आकर्षक असं पिकनिक पॉईंट उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी काम सुरू केलं. बारा वर्षांपूर्वी सुरू झालेल हे काम आज एक आलिशान रिसॉर्टच्या रूपात उभ थाटलं आहे. या रिसॉर्टचं सुजल ग्राम असे नामकरण करण्यात आलं आहे.
त्यांच्या कुटुंबात दोन मुली एक मुलगा आणि त्यांचे पती आहेत. आपला कुटुंब सांभाळत ते या रिसॉर्टचे काम पाहत असून येथे येणाऱ्या सर्वांची आपल्या कुटुंबाप्रमाणेच ते काळजी घेतात. एखाद्या शिक्षिकेप्रमाणे त्यांची विचारपूस करत असतात. विशेष म्हणजे या ठिकाणी पिकवण्यात आलेल्या भाज्या या तेथील जीवनात वापरल्या जातात.
यामुळे रिसॉर्ट मध्ये आलेले पर्यटक याची आनंदाने गोडी चाखत आहेत. आजच्या घडीला भुजबळ यांनी उभारलेले हे रिसॉर्ट अहमदनगर मधील एक प्रमुख पिकनिक स्पॉट बनलं असून पेशाने शिक्षिका असलेल्या भुजबळ यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतीचं पार रुपड बदललं आहे.