स्पेशल

Ahmednagar Politics : कोल्हे-विखेंच्या ‘त्या’ राजकीय खेळीमुळे फडणवीसांना ‘ताप’, गणितेच बदलवली..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : सध्या महाराष्ट्रात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अनेक दिग्गज यात उतरले आहेत. शिक्षकांभोवती फिरणारी ही निवडणूक यंदा मात्र दिग्गज राजकारण्यांभोवती फिरेल असे चित्र आहे. दरम्यान आता या निवडणुकीच्या अनुशंघाने पुन्हा एकदा कोल्हेंविरोधात विखे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.

दरम्यान या लढतीमधील जय पराजयाचे गणित भविष्यातील अनेक राजकीय घडामोडींवर परिणाम करतील. अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील काही गोष्टी तापदायक ठरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विवेक कोल्हे यांनी अपक्ष अर्ज सादर केला आहे.

आज (३ जून) प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे प्रमुख डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे आता जी गोष्ट सामंजस्याने मिटेल असे वाटत असतानाच आता विखे विरोधात कोल्हे संघर्ष पाहायला मिळेल.

कोल्हे विखे संघर्ष
विखे विरुद्ध कोल्हे हा राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून सुरु असून गणेश सहकारी साखर कारखान्यात विवेक कोल्हे यांनी मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव केल्यानंतर याला आणखी धार चढली. तसेच मागील विधानसभेला विखे यांच्यामुळे पराभव झाल्याची सल अनेकदा कोल्हे यांनी बोलून दाखवली आहे.

आता नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांसाठी विवेक कोल्हे व डॉ. राजेंद्र विखे यांनी दोघांनीही अपक्ष फॉर्म भरला आहे. त्यामुळे कोल्हे विखे संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळेल.

फडणवीसांची गोची
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र यात गोची होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, विखे व कोल्हे हे दोघेही भाजपवासी. त्यामुळे दोघांशीही त्यांचे हितसंबंध चांगले. तसेच शिर्डीमध्ये खा. लोखंडे यांच्या प्रचारासाठी देखील उतरण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांची मनधरणी केली होती.

त्यावेळी फडणवीस यांनी नक्कीच काहीतरी शब्द कोल्हे यांना दिलेला होता अशी चर्चा होत होती. त्यामुळे नाशिक साठी आता कोल्हे यांची मदत स्वतः फडणवीस करतील असे वाटत असतानाच विखे यांनीही अपक्ष फॉर्म भरला असल्याने व शिंदे गट देखील तेथे दराडे यांना उभे करायच्या तयारीत असल्याने फडणवीस आता महायुतीचा धर्म पाळतील की कोल्हे किंवा विखेंची मदत करतील हा चर्चेचा विषय झाला आहे.

विधानसभेला काय?
आता जर कोल्हे निवडणून आले तर विधानसभेला महायुतीचा कोपरगाव मतदार संघाचा तिढा सुटेल व शिर्डीतील विखेंचाही विरोध मावळेल. परंतु विखे यांना अपयश आले तर विधानसभेला नाराज कोल्हे यांना शांत करण्यास व त्यांची ताकद भाजपसाठी वळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना खूपच मेहनत करावी लागेल यात शंका नाही.

पंचरंगी लढतीची शक्यता
संदीप गुळवे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. कोल्हे व विखे दोघे अपक्ष आहेत. शिंदे गटाकडून दराडे उभे राहतील असा अंदाज आहे. तर शिवसेनेच्या उपनेते शुभांगी पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले असून त्या शिवसेनेत बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणार का? हे पाहावे लागेल.

असे झाल्यास नाशिक शिक्षक मतदार मध्ये गुळवे-कोल्हे-विखे-दराडे-शभंगी पाटील अशी पंचरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

Ahmednagarlive24 Office