Ahmednagar Politics : मी मंत्री विखेंचे आशीर्वाद घेणार..विखे कुटुंब जिल्ह्यातील मोठा परिवार, मला त्यांचा अभिमान..मी अभिमानाने सांगतो दुग्ध विकास मंत्री माझ्या जिल्ह्यातला… हे उद्गार आहेत नवनिर्वाचित खा. निलेश लंके यांचे. त्यांचा केडगाव येथे नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे
नेमेके काय म्हणाले निलेश खा. निलेश लंके ?
निवडणुकीस मी सन्माननीय उमेदवाराच्या विरोधात उभा होता. १३ तारीख संपली निवडणूक संपली. आता मित्यांच्या विरोधात बोलणे योग्य ठरणार नाही. निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या विरोधात बोलावेच लागते. त्या काळात माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल, त्यांच्याकडूनही एखादा शब्द गेला असेल.
पण निवडणूक संपल्यानंतर त्यांच्याविषयी बोलणे चुकीचे आहे. विखे परिवार जिल्ह्यातील मोठा परिवार आहे. आशिया खंडात पहिला साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभा केला. याचा मला अभिमान आहे. विखे कुटुंबाचे विकासात मोठे योगदान आहे. मी महाराष्ट्रभर फिरत असताना दुग्धविकास मंत्री माझ्या जिल्ह्याचा आहे हे मी अभिमानाने सांगतो.
उद्या जर माझे काही काम अडले तर मी आता हक्काने पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे गेले पाहिजे. राजकारणात कुणी कुणाचे शत्रू नसते. निवडणूक झाली की राजकीय द्वेष बाजूला सारला पाहिजे. सूडबुद्धीचे राजकारण आपल्याला बदलायचे आहे. याची सुरवात स्वतःपासून करावी लागणार आहे. त्यामुळे मी आता हा विरोध निवडणूक संपताच सोडून दिला आहे.
पालकमंत्र्यांचे आशीर्वाद घेणार
निवडणुकींमधील विरोध, द्वेष हा त्याच वेळी सोडून दिला पाहिजे. मी देखील हा राग धरून चालणार नाही. अन्यथा जनता मलाही नाव ठेवेल.
आगामी काळात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आशीर्वाद घेईल. माझे जे काही कामे असतील ते त्यांना सांगून ते मार्गी लावा अशी मदतही मागेल असे वक्तव्यही खा. निलेश लंके यांनी केला.