Ahmednagar Politics : लोकसभा संपली अन चर्चा सुरु झाली विधानसभेची. लोकसभेला भाजपसह महायुतीला मोठ्या प्रमाणात अपयश आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता आगामी विधानसभेला अर्थात आमदारकीच्या निवडणुकांच्या अनुशंघाने भाजप मंथन करून मते वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आपली आहे तीच मते रॊखून ठेवण्यासाठी लागेल तो प्रयत्न करेल.
महायुतीला लोकसभेला अहमदनगर जिल्ह्यातही मोठे अपयश आले. विखेंसह दोन्ही उमेदवार पडले. लोकसभेला महायुतीला फटका बसण्याचे अनेक करणे असली तरी त्यात कांदा, कांद्याचे भाव अर्थात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष हा मुद्दा सर्वात जास्त अधोरेखित करणारा ठरला. त्यात विरोधकही हा मुद्दा शेतकऱ्यांच्या मनावर ठसवण्यात यशस्वी झाले.
विविध आंदोलने करून शेतकऱ्यांचा हा मुद्दा हायलाईट करण्यात आला. दरम्यान आता कांद्याचे भाव वाढले असून लोकसभेला एकदा याबाबत मनातील संताप काढल्यानंतर याची प्रक्षोभता कमी होईल असे चित्र आहे. दरम्यान आता विधानसभेला कांदा नव्हे तर दोन मोठे मुद्दे आहेत ते जर गाजले तर अहमदनगरमध्ये विखे कुटुंबियांसह भाजपला व राज्यात महायुतीला ते मुद्दे जड जातील असे चित्र आहे. आता हे मुद्दे कोणते याबाबत सविस्तर पाहुयात…
१) दुधाचे भाव
हा मुद्दा साधा वाटला तरी याबाबत प्रचंड अस्वस्थता शेतकऱ्यांत आहे. जिल्ह्यातील जर वर्ग पाहिला तर दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. सध्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची ओरड आहे. शासनाने दुधाला अनुदान जाहीर केले होते. परंतु अनुदान खात्यावर आलेच नसल्याची ओरड सध्या होतेय. त्यामुळे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला असल्याची भावना शेतकऱ्यांत आहे. आता या अनुशंघाने आंदोलनास सुरवात झाली आहे.
म्हणजेच वातावरण हळूहळू तापायला लागले आहे. याची सुरुवात अहमदनगरमधून झालीये. दुधाचे दर वाढवून मिळावेत, यासाठी दूध उत्पादक शेतकरी २५ जूनला हरेगाव फाटा येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार होते. तसे निवेदन उंदीरगावच्या शेतकऱ्यांनी श्रीरामपूचे तहसीलदार मिलींद वाघ यांना दिले होते. मात्र त्यांनी नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करून आंदोलन स्थगित करण्याबाबत लेखी नोटीस बजावली आहे.
मात्र सरकारने कितीही वेळा परवानग्या नाकारल्या तरी छातीवर गोळ्या झेलू, पण दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन करणारच, असा इशारा शेतकरी संघटनेने दिलाय. तर दुसरीकडे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील पुढील आठ दिवसांमध्ये दूधाच्या दरामध्ये वाढ करावी अन्यथा दूध उत्पादक, महिला, लहान मुले, जनावरे आदींसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. हे आंदोलन जर पेटत गेले व विरोधकांनी याला सपोर्ट केला ते हे आंदोलन राज्यव्यापी होण्यास वेळ लागणार नाही. यातून मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसू शकतो हे वेगळे सांगणे न लगे.
२) आरक्षण
दुसरा एक मुद्दा हे तो देखील सत्ताधाऱ्यांना अडचणींचा ठरू शकतो. तो म्हणजे आरक्षणाचा मुद्दा. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाद्वारे आंदोलनाची धग पेटवली आहे. पण सध्या सत्ताधारी कात्रीत सापडले आहेत. सर्व मागण्या मान्य केल्या तर एक समाज खुश होईल पण ठराविक समाज नाराज होईल.
तर दुसरीकडे मागण्या मान्यच झाल्या नाही तर पुन्हा एकदा मराठा समाजाची नाराजगी ओढवली जाईल व मराठवाड्यात जे झाले ते महाराष्ट्रातील अनेक भागात दिसू शकते. त्यामुळे सरकारला आता सर्वांच्या संमतीने, सर्वाना सोबत घेत विचार विनिमय करत तोडगा काढावा लागेल.
लोकसभेला कांदा आंदोलनाची धग कशी पेटली गेली?
कांदा आंदोलनाची सुरवात नाशिक मधून झाली. निर्यातबंदीविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरवात केली. त्याचवेळी याचे गांभीर्य ओळखून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यात उडी घेतली.
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात निर्माण होत असलेला रोष हेरून पवार यांनी थेट मैदानात उतरून शरद पवार गटाने रास्तारोको आंदोलन केले. मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडची निवड त्यांनी या आंदोलनासाठी केलेली दिसली.
त्यांच्या या खेळीला ठाकरे गट व काँग्रेसचेही पाठबळ मिळाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर हालचाल करण्यास सुरवातही केली पण त्यांना केंद्रातून यश आले नाही हा भाग वेगळा. म्हणजे लोकसभेला कांदा आंदोलनाची धग हळूहळू पेटली गेली व त्यासह स्वरूप व्यापक झाले. तसे वरील दोन प्रश्न व्यापक बनू शकतात असा अंदाज आहे.
निवडणुकांना कालावधी
वरील दोन समस्या सत्ताधाऱ्यांपुढे असतील या केवळ शक्यता आहेत. त्यात राधाकृष्ण विखे पाटील हे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री आहेत. परंतु विधानसभेला अद्याप वेळ आहे. त्यामुळे आगामी काळात बरेच पाणी पुलाखालून वाहून जाईल.
सत्ताधारी यावर नक्कीच उपाययोजना करतील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसारखे दिग्गज व धुरंधर नेते भाजपसोबत असल्याने यावर नक्कीच उपाययोजना करून भाजप यावर मात करेल यात शंका नाही. परंतु विरोधकही याच मुद्द्यांचे भांडवल करतील हे ही तितकेच खरे.