स्पेशल

Ahmednagar Politics : ठाकरे गटाकडून शिक्षक मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर, थोरात-तांबे हे विवेक कोल्हेंना मदत करतील की ठाकरेंना साथ देतील? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक संपलेल्या आहेत. त्यानंतर आता सुरु झालीये ती म्हणजे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची लगीन घाई. त्यात आता नाशिक शिक्षक मतदारसंघाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

कारण येथे दिग्गज राजकीय नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळेल व सोबतच राजकीय गणिते देखील वेगवेगळी पाहायला मिळतील. एकीकडे भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मुलाने विवेक कोल्हे यांनी अपक्ष फॉर्म भरला.

दरम्यान आता येथे ठाकरे गटाकडून शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाने येथे संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. गुळवे यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला होता व या प्रवेशासोबतच त्यांना आता नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली आहे. आज शनिवारी ठाकरे गटाने हा आपला उमेदवार जाहीर केला.

थोरात-तांबे कुणाचे काम करतील ?
शिर्डीमधील गणेश कारखाना असेल किंवा संस्थानची सोसायटी असो कोल्हे व आ. बाळासाहेब थोरात यांनी एकत्र लढवत विखे यांना शह दिला. त्यावेळी कोल्हे हे भाजपचे असूनही व थोरात काँग्रेसचे असूनही त्यांनी कसलाही विचार न करता एकमेकांची साथ दिली.

तसेच माजी आ. सुधीर तांबे हे देखील या निवडणुकीत कोल्हे यांना मदत करतील अशा चर्चा सुरु होत्या. त्यामुळे आता या निवडणुकीत थोरात व तांबे हे नेमके कुणाला मदत करतील? महाविकास आघाडीचा धर्म पाळत गुळवे यांना कि कोल्हे यांना? अशी चर्चा सुरु आहे.

चौरंगी लढत?
ठाकरे गटाने गुळवे यांना उमेदवारी दिली तर आता महायुतीकडून या मतदारसंघातून किशोर दराडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विवेक कोल्हे हे अपक्ष उभे आहेत. तसेच टीडीएफ कडून भाऊसाहेब कचरे यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे आता ही लढत चौरंगी होईल असे दिसते.

 

Ahmednagarlive24 Office