स्पेशल

Ahmednagar Politics : मुद्दा मराठा आरक्षणाचा पवारांनी विकेट काढली ती मात्र विखेंचीच !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Politics : शरद पवार काय करतील त्याचा नेम नसतो. शनिवारी त्यांनी संभाजीनगर, अहिल्यानगर दौरा केला. वयाच्या 84 व्या वर्षीही त्यांनी 24 तासांत सहा कार्यक्रम घेतले. नुसते कार्यक्रमच घेतले नाही, तर मराठा, मुस्लिम, बंजारा, धनगर, लिंगायत समाजाचा पाठींबाही मिळवला. विशेष म्हणजे नगरमध्ये फक्त 20 मिनिटे थांबत, त्यांनी विखेंच्या बालेकिल्ल्यात विखेंचीच विकेट काढली.

शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शरद पवार हे संभाजीनगरमध्ये आले. त्यानंतर त्यांनी हज हाऊसमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तेथे सुमारे दोन तास वेळ देत मुस्लिम समाजाला विश्वास दिला. शनिवारी ते तेथेच मुक्कामाला होते. शनिवारी सकाळी त्यांनी मराठवाड्यातील सुमारे 25 मतदारसंघातील विधानसभेला इच्छुकांच्या भेटी घेतल्या. सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतली.

त्यानंतर बारा वाजता मोतीराज राठोड यांच्या पुस्तक पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बंजारा समाजाला आपलंस केले. दुपारी चार वाजचा पक्षांचा कार्यकर्ता मेळावा घेतला. सायंकाळी पाच वाजता पुन्हा एक पुस्तक प्रकाशन केले. सायंकाळी सहा वाजता जालन्याचे नवनिर्वाचित खा. कल्याण काळे यांचा सत्कार केला. या दौऱ्यात पवार साहित्यिक, सामाजिक व राजकीय मिलाफ घडवताना दिसले. शिवाय पवारांनी जालना, संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस, ठाकरेगट व स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवला.

त्यानंतर पुण्याकडे जाताना सायंकाळी ते नगरमध्ये आले. नगरमध्ये फक्त 20 मिनिटे भेट दिली. मात्र या 20 मिनिटांत त्यांनी मराठा आंदोलकांची वेळ देत, आपणच महाराष्ट्राचे किंगमेकर आहोत, हा संदेश आख्ख्या महाराष्ट्राला दिला.शिवाय विखेंची त्यांच्यात मतदारसंघात कोंडी केली. ती कशी ते समजून घेऊ.

नगरमध्ये पवारांनी मराठा आंदोलकांना वेळ दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न विधानसभेपूर्वी निकालात काढण्याचा शब्द दिला. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्‍यांना बोलावून मी माझं म्हणणं स्पष्ट करेल. शिवाय मुख्यमंत्री जो निर्णय देतील, तो माझ्यासह संपूर्ण राष्ट्रवादीला मान्य असेल असंही सांगितलं. म्हणजेच मुख्यमंत्री मराठा समाजाला, जर ओबीसीतून आरक्षण देत असतील तर त्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठींबा असेल, असं पवारांनी स्पष्ट केलं. पवारांचा हाच मुद्दा विखेंसह महायुतीला कोंडीत पकडणारा होता.

कारण आरक्षणाचा प्रश्न कात्रीत पकडणारा आहे. मराठा समाजा ओबीसीतून आरक्षण मागतोय. मात्र ओबीसी समाज या मागणीला विरोध करतोय. याच वादाने सध्या महाराष्ट्र पेटलाय. मराठ्यांना आरक्षण देताना भाजप व महायुती ही ओबीसींनाही न दुखविण्याचे धोरण ठेवतेय. त्यामुळेच मराठ्यांना स्वतंत्र 10 टक्के आरक्षण यापूर्वीच देण्यात आलेय. मात्र जरांगे ओबीसीतूनच आरक्षण मागण्याचा हट्ट करताहेत. महायुतीला ओबीसींना दुखवायचे नाही. त्यामुळे भाजप जरांगेंना सडेतोड उत्तर देतंय. फडणवीस, दरेकर, लाड आणि स्वतः मंत्री विखेंनी मनोज जरांगेंना अंगावर घेतलंय.

नगरमध्ये मात्र पवारांनी परफेक्ट खेळी केली. मराठा आंदोलकांची भेट घेऊन व त्यांना आश्वासन देऊन, पवारांनी आपणच परफेक्ट मराठा नेते आहोत, हे दाखवून दिलंय. शिवाय विखेंच्या बालेकिल्ल्यातील मराठा वोट बँकही आपल्याकडे वळवली. या भेटीत मराठा आंदोलकांनी पवारांचे तोंड भरुन कौतूक केले. आम्ही कायम तुमच्यासोबत होतो आता तुम्ही आमच्यासोबत राहा, असा सूरही काहींनी मराठा नेत्यांनी या भेटीत लावला.

म्हणजेच आरक्षणाचा प्रश्न कसाही सुटला, तरी पवारच नगर जिल्ह्यातील मराठा समाजाचे हिरो ठरणार आहेत. ही गोष्ट विखे नेते असलेल्या, नगर भाजपला परवडणारी नाही. अवघ्या वीस मिनिटांच्या भेटीत पवारांनी नगर जिल्ह्यातील 30 ते 35 टक्के मराठा समाजाला आपल्याकडे ओढले. यातून नक्कीच विखेंची कोंडी होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24