नगर दक्षिणेचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी शनिवारी थेट मातोश्री गाठली. शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. लोकसभेच्या निकालानंतरही लंके हे मीडियाच्या चर्चेतून बाहेर पडण्याचे नावचं घेईनात… कोणत्या ना कोणत्या कारणाने ते मीडियात बिझीच दिसतात. कधी लंके थेट बाळासाहेब थोरातांची संगमनेरात जाऊन भेट घेतात, तर कधी शरद पवारांना थेट नरगमध्ये घेऊन येतात. शनिवारी लंकेंनी थेट मातोश्री गाठली. ही भेट नगरच्या बारा विधानसभांच्या निवडणुकीसंदर्भातील होती, असा सूर सगळ्या मीडियाने आळवला. मात्र फक्त एवढेच कारण या भेटीत असावे का..? तर नक्कीच नाही. ठाकरेंची भेट घेऊन लंकेंनी एकाच दगडात तीन पक्षी मारलेत.
निलेश लंके- उद्धव ठाकरे यांच्या भेटीमागचा मतितार्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर निलेश लंके यांची कारकीर्द पहावी लागेल. निलेश लंके स्वतः फकीर समजत असले तरी, ते एक मुरब्बी राजकारणी आहेत. याचा प्रत्यय गेल्या सहा-सात वर्षांत अनेकदा आलाय. सलग तीन वेळा आमदार असणाऱ्या विजयराव औटींना पराभूत करण्यासाठी धनगर समाजाचे नेते महादेव जानकरांची त्यावेळी त्यांनी भेट घेतली होती. अगदी आत्ताचा इतिहास पहायचा तर, सुजय विखेंना पराभूत करण्याआधी त्यांच्याच पक्षातील राम शिंदे किंवा विवेक कोल्हेंशी त्यांनी घट्ट मैत्री केली होती. असो… निलेश लंकेंनी स्वतःला मुरब्बीपणा अनेकदा दाखवलाय. साखर सम्राटांच्या जिल्ह्यात सर्वसामान्य घरातील व्यक्ती काय करु शकतो, हे दाखवत त्यांनी राजकीय विश्लेषकांनाही तोंडात बोटे घालायला लावलीय. या भेटीत लंकेंनी एकाच दगडात तीन पक्षी मारलेत.
१. गैरसमजाची जळमटं काढली…
मित्रांनो, निलेश लंके हे आत्ता शरद पवार गटात असले तरी, ते पूर्वीचे कट्टर शिवसैनिक. शिवसैनिक म्हणूनच त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच त्यांनी समाजकारणाचं बाळकडू घेतलं. विजयराव औटी हे पारनेरमधून सलग तीन वेळा आमदार झाले होते. या विजयात निलेश लंके यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. २०१९ ची आमदारकी निलेश लंके यांनी लढवावी, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता. लंकेंचीही तशीच इच्छा होती. हिच महत्त्वकांक्षा लपून न राहिल्याने औटी- लंके यांच्यात खटके उडायला लागले. मार्च २०१८ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पारनेरमध्ये सभा होती. त्यात बराच गोंधळ झाला. या गोंधळाला निलेश लंकेच जबाबदार आहेत असं मातोश्रीला पटवून देण्यात लंकेच्या विरोधकांना यश आलं.याचाच परिणाम म्हणून लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. लंके मातोश्रीकरांच्या मनातून उतरले. हेच गेली कित्येक वर्षे लंकेंना खटकत होतं. त्यामुळेच आता खासदार झाल्यावर लंकेंनी थेट मातोश्री गाठली. दिमाखात ठाकरेंची भेट घेतली. मातोश्री बाहेर लंकेंच्या स्वागताचे पोस्टर झळकले. आणि लंकेंबाबत मातोश्रीकरांच्या मनात असलेली सहा वर्षांपूर्वीची गैरसमजाची जळमटं दूर झाली.
२. न्यायालयीन लढाईत साथ…
नुक्त्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत लंकेंनी डाँ. सुजय विखे पाटलांचा पराभव केला. अपेक्षेप्रमाणे काट्याची टक्कर झाली. मात्र विखेंनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन ४० मतदान यंत्रांची तपासणी करण्याची मागणी केली. निवडणूक आयोगानेही या यंत्रांची तपारणीही करणार असल्याचे सांगितलंय. सहाजिकच विखेंच्या तक्रारीत तथ्य निघालं, तर विखे ही निवडणूक कोर्टात घेऊन जातील. देशात गाजलेल्या १९९१ च्या नगर दक्षिणेतील निवडणुकीची त्यावेळी पुनरावृत्ती होईल. गडाखांना त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी साथ दिली होती. आताही आपल्यावर तशी वेळ आली, तर पवारांसोबत ठाकरेंचीही साथ मिळावी, असं लंकेंच्या डोक्यात असू शकतं. त्यामुळंच या भेटीत लंकेंनी न्यायालयीन लढाईसाठी ठाकरेंची सहानुभूती मिळवली, असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं.
३. किंग आणि किंगमेकरही…