स्पेशल

Ahmednagar Vidhansabha : संग्रामभैय्याला तिकीट मिळेल का..? संग्राम भैय्या दुसऱ्या पक्षात जाणार का..?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
अत्यंत तरुण वयात राजकारणात आलेले आमदार संग्राम जगताप यांचा यशाचा आलेख चढता राहिला.  दोनदा महापौर आणि दोनदा आमदार असलेले संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा विधानसभेसाठी जाण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी संग्राम जगताप हे थेट मंत्री होतील, असे म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच ऊर्जा भरली होती. मात्र तटकरेंच्या या विधानाला दोन महिने होत नाहीत तोच संग्रामभैय्याला तिकीट मिळेल का..? संग्राम भैय्या दुसऱ्या पक्षात जाणार का..? अशा चर्चा सुरु झाल्या. नगरच्या जागेवर भाजपने व त्यापाठोपाठ शिंदे गटानेही दावा केलाय, हे खरं असलं तरी, महायुतीकडून संग्राम जगतापच नगरमधून लढतील, अशी शक्यता सर्वात जास्त आहे. काय आहेत नगरची सध्याची गणितं, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंना नगर विधानसभेतून 54 हजारांचे मताधिक्य होतं. 2014 ला मात्र, हे मताधिक्य घटलं. सुजय विखेंना यावेळी फक्त 31 हजारांचं लीड मिळालं. याचं खापर स्थानिक भाजपने फक्त संग्राम जगतापांवर फोडलं. मिळालेलं लीड हे फक्त भाजपचंच आहे, यात राष्ट्रवादीचा वाटा नाही, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निकालानंतर केला. नगरची जागा महायुतीने भाजपला द्यावी, असा आग्रह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरु केला.

महायुतीतली धुसफूस

भाजपनंतर शिवसेनेचा शिंदेगटही पुढे आला. गेल्या 25 वर्षांपासून शहरात शिवसेनेची ताकद आहे, असं म्हणत ही जागा शिंदे गटानेही मागितली. झालं. तेव्हापासून संग्राम जगतापांचं यंदा खरं नाही, अशा चर्चा सुरु झाल्या. एकीकडे अजित पवार गट संग्राम जगतापांना बळ देत असतानाच, दुसरीकडे महायुतीतली धुसफूस समोर येऊ लागली आहे.

यांची नावे पुढे…

भाजपाकडून अ‍ॅड. अभय आगरकर, भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची नावे चर्चेत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम यांची नावे पुढे आली आहेत.

संग्राम जगतापांचं पारडं जड का ?

काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही बाळासाहेब थोरातांना मध्यस्थी घालत दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर हेच संग्राम भैय्या विरोधात उमेदवारी करतील, असेही काहींचे म्हणणे आहे. आता ही सगळी खिचडी पाहता, यंदा संग्राम जगतापांना उमेदवारी मिळेल का, असे प्रश्न समोर येऊ लागलेत. मात्र यंदाही ही जागा अजितदादा गटच लढवेल व उमेदवार संग्राम जगतापच असतील, अशी शक्यता सर्वात जास्त आहे. आता संग्राम जगतापांचं पारडं जड का, तर ते आपण पाहू.

तरुण उमेदवार
संग्राम जगताप हे अगदी तरुण आहेत. शिवाय शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता त्यांनी 2014 च्या मोदी लाटेतही हिसकावून घेतली. यंदा आमदार झाल्यास त्यांची हॅट्रीक होईल व त्यांना मंत्रीपदाची संधीही मिळेल, अशा शक्यता आहेत. अजितदादांना आपल्यासोबत दिर्घकाळ राहणारा आमदार हवा असल्याने ते संग्राम जगतापांनाच पुन्हा तिकीट देतील, असे वाटते.

सर्वसमावेशक चेहरा
गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर संग्राम जगताप हे सर्व जातीधर्मात मिसळणारे व्यक्तीमत्व आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांची फॅन फाँलोविंग आहे. लोकसभेला दलित व मुस्लिम समाजाने महायुतीच्या विरोधात मतदान केले. मात्र नगर शहरातील राजकारण पाहता संग्राम जगतापांना या दोन्ही समाजाकडून मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांचे पारडे जड होते.

मोठ्या नेत्यांची साथ
जगताप कुटुंब दोन पिढ्यांपासून राजकारणात आहे. स्थानिक भाजपचे कार्यकर्ते जगतापांवर दहशतीचा आरोप करत असले तरी, विखे कुटुंब जगतापांसोबत आहे. केंद्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मोदींच्या नगरच्या सभेच्यावेळी जगतापांमधील सर्वसमावेश शैली सगळ्यांना अनुभवली, त्यामुळे महायुतीचे इतर नेते त्यांच्या तिकीटाला विरोध करतील, असे वाटत नाही.

अहमदनगर लाईव्ह 24