भारताच्या आकाशात दोन वर्षात भिरभिरणार ‘एअर टॅक्सी’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : मेट्रो मोनो रेल्वे, बुलेट ट्रेन असो वंदे भारत असो की सध्या चर्चेत असलेली पॉड टॅक्सी असो, वाहतुकीची साधने जितकी बदलत आहेत, तितकीच ती अधिक आधुनिक आणि शहरी गतिशीलतेनुसार अनुकूल होत आहेत.

याच क्रमाने आता आकाशामध्ये एअर टॅक्सी भिरभिरत जाताना दिसू लागली तर नवल वाटायला नको. देशातील अव्वल इंडिगो एअरलाइन्सची पालक कंपनी असलेली इंटरग्लोब एंटरप्राइजेस आणि अमेरिकेची आर्चर एव्हिएशन या दोन्ही कंपन्यांनी २०२६ मध्ये भारतात संपूर्णपणे इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

पहिली एअर टॅक्सी राजधानी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस ते गुरुग्रामपर्यंत झेपावण्याची शक्यता आहे. त्यानंतर एअर टॅक्सी मुंबई आणि बंगळुरूच्या आकाशात उड्डाण करताना दिसणार आहे.

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन नियमकांबरोबर याबाबत चर्चा करण्यात आली असून विमानांसाठी प्रमाणन प्रक्रिया प्रगत टप्प्यावर आहे. पुढील वर्षी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे.

हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आर्चर एव्हिएशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एडम गोल्डस्टीन यांनी सांगितले.

अशी असेल एअर टॅक्सी

या एअर टॅक्सीला मिडनाईट असे नाव देण्यात आले आहे. यासाठी ईव्हीटीओएल (इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ लैंडिंग) विमानाचा वापर केला जाणार असून यामध्ये पायलट व्यतिरिक्त चार प्रवासी बसू शकतात.

सहा बॅटरी पॅक असलेले हे विमान ३० ते ४० मिनिटांत पूर्णपणे चार्ज होईल. एकदा चार्ज केल्यावर अंदाजे १५० किमीपर्यंत उड्डाण करू शकते. वेगाने उड्डाण करण्यासाठी इंडिगो आणि आर्चर संयुक्तपणे मूलभूत पायाभूत सुविधा विकसित करणार आहेत.

अशी २०० विमाने ताफ्यात ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. कॅनॉट प्लेस ते गुरुग्रामपर्यंतच्या २७ किलोमीटरच्या अंतरासाठी रस्तामार्गे जाण्यासाठी सुमारे ९० मिनिटे लागतात. एअर टॅक्सी अवघ्या ७ मिनिटांत हे अंतर पार करेल.