स्पेशल

नगरच्या पोखर्डी गावच्या अक्षय यांनी घेतले डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन! मिळाला पुणे बाजार समितीत 501 रुपयांचा विक्रमी दर

Published by
Ajay Patil

शेतीमध्ये कुठल्याही पिकापासून जर तुम्हाला दर्जेदार आणि भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर त्याकरिता त्या पिकाच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये तुम्हाला तंत्रज्ञानाला धरून आणि पिकांच्या गरजेनुसार व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. अगदी पिकांच्या लागवडीसाठी जेव्हा शेतीची निवड केली जाते तिथपासून त्याची सुरुवात होते तर शेतीची पूर्व मशागत, आंतरमशागतीच्या टप्प्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण नियोजन करणे गरजेचे असते व तेव्हाच दर्जेदार स्वरूपाचे उत्पादन हे हाती मिळत असते.

अगदी याच पद्धतीने जर आपण नगर तालुक्यात असलेल्या पोखर्डी येथील अक्षय संजय कराळे या तरुण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी  शिक्षण तर घेतले परंतु नोकरीच्या शोधामध्ये वेळ वाया न घालवता स्वतःला शेतीमध्ये झोकुन दिले व गेल्या बारा वर्षापासून नगर तालुक्यात असलेले अरणगाव येथील दहा एकर क्षेत्रामध्ये त्यांनी डाळिंबाची लागवड केलेली आहे.

विशेष म्हणजे अक्षय यांचे डाळिंबाचे व्यवस्थापन इतके वाखाणण्याजोगे आहे की वर्षाला ते या दहा एकर बागेतून तब्बल 100 ते 125 टन डाळींबाचे उत्पादन घेतात व कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न हाती मिळवतात.

विशेष म्हणजे यावर्षी त्यांनी पिकवलेल्या डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या माध्यमातून यांनी त्यांच्या पिकवलेल्या डाळिंबाला विक्रमी दर मिळवत डाळिंब बागेच्या व्यवस्थापनातील चुणूक दाखवून दिलेली आहे.

 अक्षय यांच्या डाळिंबाला मिळाला प्रति किलो 501 रुपयाचा भाव

यावर्षीच्या डाळिंब हंगामातील पुणे बाजार समितीमध्ये सर्वात दर्जेदार डाळिंब अक्षय यांचे असल्यामुळे पुणे अडते असोसिएशन व व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून अक्षय यांचा सत्कार देखील करण्यात आला. सोमवारी त्यांनी विक्रीसाठी पुणे बाजार समितीमध्ये दोन टन डाळींब नेले होते व यामध्ये एक एक डाळिंबाच्या फळाचे वजन 300 ग्राम पेक्षा जास्त होते.

यामध्ये 350 ते 400 ग्रॅमच्या डाळिंबाला 390 रुपये प्रति किलो, 400 ते 420 ग्रॅमच्या डाळिंबाला 430 तर 500 ते 550 ग्रॅमच्या डाळिंबाला तब्बल पाचशे एक रुपया प्रतिकिलोचा दर मिळाला. विशेष म्हणजे पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो 501 रुपयाचा दर मिळाला व हा दर या हंगामातील सर्वोच्च दर ठरला आहे.

गेल्या बारा वर्षापासून डाळिंबाच्या शेतीमध्ये स्वतःला झोकून देऊन काबाडकष्ट करून दर्जेदार उत्पादन घेण्यावर अक्षय यांचा भर असल्याने त्यांना हे यश मिळालेले आहे.

सध्या जर आपण घाऊक बाजारातील डाळिंबाचे दर पाहिले तर ते साधारणपणे प्रति किलोला शंभर रुपयांपासून तर चारशे रुपये पर्यंत आहेत. परंतु अक्षय यांनी पिकवलेला डाळिंब हा दर्जेदार असल्यामुळे त्यांना पाचशे एक रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळाला.

 दहा एकरमध्ये आहे डाळिंबाची बाग

अक्षय कराळे यांनी शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता जेव्हा शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी फळबाग लागवड करण्याचे ठरवले व यासाठी डाळिंबाची निवड केली. डाळिंबाची निवड करण्याअगोदर त्यासंबंधीची सगळी तयारी केली व माहिती घेऊन नगर तालुक्यातील अरणगाव येथे दहा एकर जमिनीमध्ये तब्बल साडेतीन हजार डाळिंबाच्या झाडांची लागवड केली.

योग्य व्यवस्थापन तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून अक्षय हे दहा एकर मधून वर्षाला 100 ते 125 टन इतके उत्पादन घेतात. प्रत्येक हंगामामध्ये दर्जेदार डाळिंब पिकवून ते चांगला भाव मिळवत कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न देखील पदरी पडतात.

Ajay Patil