Gold prices : सोने-चांदी हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्वाचा घटक. सण असो की लग्नसमारंभ, गुंतवणूक असो की साधी खरेदी यात सोन्याला अत्यंत महत्व. सोने व चांदीचे दागिने हा महिलांचा खास आवडता विषय.
परंतु सध्या अलीकडील काळात सोने चांदीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. वर्षभरात सोन्याचे भाव तब्बल सात ते नऊ हजारांनी प्रतितोळे वाढले आहेत. चांदीचे दर ५ हजार रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत. दरम्यान हे दर आणखी वाढू शकतात, असा व्यापाऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे.
* एक नजर सोन्याच्या दरावर
आजचा भावः ६२८०० (प्रतितोळा)
जानेवारी २०२३ : ५६६५० (प्रति तोळा)
जानेवारी २०२४ : ६५१२० (प्रति तोळा)
* किमतींमध्ये चढ उतार सुरूच
सोन्याच्या किमतीमध्ये चढ उत्तर पाहायला मिळत आहे. कधी सोने कमी होते तर कधी अचानक वाढते. ऑक्टोबर २०२३ मध्ये सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या. नोव्हेंबरनंतर पुन्हा दर वाढले.
मार्चनंतर चांदीच्या किमतीत वाढ झाली. मागील वर्षात सुरुवातीला सोने व चांदीचे दर कमी होते. मध्यंतरी दोन्हींचे दर कमी जास्त झाल्याचे पाहायला मिळाले. नोव्हेंबर २०२३ नंतर पुन्हा दरवाढ झाली.
आपण जर एक नजर किमतींवर टाकली तर, जानेवारी २०२३ मध्ये सोने ५७ हजार रुपये प्रतितोळा असल्याचे पाहायला मिळाले. ते यंदा ६३ हजार रुपये प्रतितोळा झाले आहे. ही तफावत पाहता सोने सहा ते सात हजार रुपये प्रतितोळा इतके वाढले आहे, चांदी जानेवारी २०२३ मध्ये ६९ हजार रुपये प्रति किलोवर होती. ती आता ७३ ते ७४ हजार रुपये किलोवर पोहोचली आहे.
* दर ७० हजारांवर जाऊ शकतो?
सराफा व्यावसायिक सांगतात की, जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या भावात सतत चढ उतार होत आहेत. सोन्याचा भाव ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो किंवा सध्याच्या दरापेक्षा कमीही होऊ शकतो.
अस्थिर परिस्थिती असल्याने दर कमी-जास्त होत आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि बाजारातील अस्थिरता यावर दर कमी जास्त होतील असा अंदाज सराफा व्यावसायिक मांडत आहेत.