POCRA Scheme:- केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी आणि त्या माध्यमातून शेती क्षेत्राचा व शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील पायाभूत सुविधांची उभारणी करिता अनुदान स्वरूपात किंवा कर्ज स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
अगदी याच पद्धतीची जर आपण राज्य शासनाची योजना पाहिली तर ती म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा ही होय. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची असून या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील विविध कामांकरिता किंवा घटकांकरिता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
याच योजनेच्या अनुषंगाने बघितले तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा करिता नाशिक जिल्ह्यातील तब्बल 674 गावांची निवड करण्यात आली असून यामध्ये एकट्या मालेगाव तालुक्यातील 142 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. साधारणपणे या योजनेचे स्वरूप जर बघितले तर या माध्यमातून फळबागांना शंभर टक्के,
शेडनेटला 80 टक्के तर ठिबकसाठी 75 टक्के अनुदान देण्यात येते व त्यासोबतच शेती उपयोगी यंत्र जसे की ट्रॅक्टर इतर योजनांकरिता 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
जागतिक बँकेच्या अर्थसाहयातून हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येत असून याकरिता 6000 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जागतिक बँकेच्या माध्यमातून मिळवून या प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक लाभार्थी गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
कधी सुरू करण्यात आली ही योजना?
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेची सुरुवात सन 2018 मध्ये करण्यात आलेली होती. या योजनेचा कालावधी हा सहा वर्षाचा होता व पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या वर्षी मालेगाव तालुक्यातील 142 गावांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता.
नुकताच या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आली असून यामध्ये देखील मालेगाव तालुक्याचा दुसऱ्यांदा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश आहे त्या गावांची यादी जर पाहायची असेल तर ती तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाहता येणार आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करायचा असेल व या योजनेविषयी अधिकची माहिती हवी असेल तर तालुका कृषी कार्यालय, मंडल कृषी अधिकारी व कृषी सहायक यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
कसे आहे या योजनेचे स्वरूप?
या योजनेचा जर प्रमुख उद्देश बघितला तर हवामान बदलामुळे शेती क्षेत्रासमोर जी काही आव्हाने निर्माण झालेली आहेत.त्यांना तोंड देता यावे याकरिता शेती पद्धती विकसित करणे हा प्रमुख उद्देश आहे. त्याद्वारे हवामान अनिश्चितता व बदलाशी जुळवून घेण्याकरिता शेतकऱ्यांना सक्षम करणे,
हवामान बदल अनुकूल शेती पद्धती विकसित करणे याकरिता शेतकऱ्यांना अनुदानावर विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात. पोखरा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाचे घटक व शेतकरी गटांसाठी दिले जाणारे घटक असे दोन गट करण्यात आलेले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ अंतर्गत ट्रॅक्टर,
यांत्रिक अवजारे तसेच वृक्ष लागवड, फळबाग लागवड, शेततळे, पाणी उपसा साधने, पाईप तसे ठिबक सिंचन, शेडनेट हाऊस, पॉलिहाऊस, हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बियाण्यांचे बीजोत्पादन, बंदिस्त शेळीपालन तसेच कुक्कुटपालन,
रेशीम उद्योग, मधमाशीपालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, शेततळे अस्तरीकरण, विहीर तसेच गांडूळ खत निर्मिती व सेंद्रिय खत निर्मिती इत्यादी योजना समाविष्ट असून यावर 75 ते 90% अनुदान दिले जाते. पोखरा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.