Marathi News : अंतराळाच्या अनंत जगात असंख्य लघुग्रह अस्तित्वात आहेत. त्यापैकी सुमारे १६ हजार लघुग्रह पृथ्वीजवळ असल्याचे सांगितले जाते. लघुग्रह कसे तयार झाले याचा शोध अद्याप लागलेला नसला तरी शास्त्रज्ञ त्यांना ग्रहांचे विखुरलेले तुकडे मानतात.
सूर्यमालेत ते सतत सूर्याभोवती फिरतात, शिवाय त्यांची रचनाही ग्रहांसारखी असते. त्यामुळे ग्रहांसोबतच लघुग्रह तयार झाल्याचे मानले जाते. पण असे लघुग्रह पृथ्वीच्या जवळ आल्यावर धोकादायक बनतात.
पृथ्वीसोबत त्यांची धडक होण्याची शक्यता असल्याने अमेरिकन अंतराळ संस्थेकडून सातत्याने अशा ग्रहांचा माग काढला जातो. असाच एक ९२ फुटांचा लघुग्रह नासाच्या शास्त्रज्ञांना आढळला असून तो पृथ्वीच्या अतिशय जवळ पोहोचल्याचा दावाही नासाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
नासाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, जवळपास ९२ फूट आकाराचा हा लघुग्रह गुरुवारी काही तासांसाठी पृथ्वीच्या जवळ आला असून त्याचे नाव ‘२०२३ वायडी’ आहे. त्याची रुंदी ९२ फूट आहे. नासाने त्याच्या आकाराची तुलना विमानाशी केली असून हा लघुग्रह २०२३ मध्येच सापडला होता.
तो गुरुवारी पृथ्वीच्या जवळ म्हणजे सुमारे ६ लाख किलोमीटर अंतरावर असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे ७५ लाख किलोमीटरच्या परिघात येणारा लघुग्रह धोकादायक ठरू शकतो, असे नासाचे म्हणणे आहे. नासाचे शास्त्रज्ञ मागील काही दिवसांपासून सातत्याने या लघुग्रहावर लक्ष ठेवून आहेत.
या लघुग्रहांसंबंधी नासाकडून दररोज अलर्ट येत आहेत. नुकताच एक मोठा लघुग्रह पृथ्वीजवळून गेला. हा लघुग्रह ७२ फुटांचा होता. त्याचे नाव ‘२०२३ एक्स ०१’ असे आहे. तो पृथ्वीपासून २४.१ लाख किलोमीटर अंतरावरून गेल्याचे सांगण्यात आले.
लघुग्रह आणि पृथ्वीची टक्कर ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जात असली तरी अशा घटनेची शक्यता नाकारता येत नाही. कारण हा लघुग्रह तुलनेत तुलनेत खूपच लहान आहे. अशा परिस्थितीत, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्यांना सहजपणे स्वतःकडे खेचू शकते.
पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण ९.३ मीटर प्रति सेकंद वेगाने एखादी वस्तू स्वतःकडे खेचू शकते. अशा परिस्थितीत कधी कधी उल्काही पृथ्वीकडे खेचल्या जातात. असे लघुग्रह आणि उल्का या दोन्हींचे पृथ्वीवर पडणे हानीकारक ठरू शकते. त्यामुळे असा लघुग्रह पृथ्वीजवळ येणे धोकादायक ठरू शकते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.