Dairy And Poultry Farming Business:- पालकांचा त्यांच्या मुलांबद्दल असलेला ट्रेंड जर आपण बघितला तर साधारणपणे चांगले उच्च शिक्षण घेऊन मुलाने किंवा मुलीने नोकरी करावी आणि आयुष्यामध्ये सेटल व्हावे अशा प्रकारची नियोजन असते व याकरिता पालक हे मुलांच्या उत्तम करिअरच्या दृष्टिकोनातून इंजिनिअरिंग किंवा मेडिकल तसेच इतर महागड्या अशा कोर्सेसला प्रवेश घेतात व शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.
परंतु आपल्याला असे देखील अनेक तरुण-तरुणी दिसून येतात की ते उच्च शिक्षित असून देखील नोकरी न करता व्यवसायमध्ये पडतात किंवा नोकरी शोधून थकतात व नोकरी न मिळाल्याने व्यवसाय करायला सुरुवात करतात व कष्टाने व्यवसायात यशस्वी देखील होतात व नोकरीपेक्षा जास्त पैसा व्यवसायातून कमावतात.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील कौस्तुभ शिरीष देशमुख यांची यशोगाथा बघितली तर ती आजकालच्या युवकांना आणि शेतकऱ्यांना खूप प्रेरणादायी अशी आहे.
कौस्तुभ शिरीष देशमुख यांनी इलेक्ट्रिक इंजीनियरिंग आणि त्यामध्ये एमटेक पूर्ण केले. परंतु एवढे मोठे उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी न करता शेती व्यवसाय आणि शेतीला पूरक व्यवसाय करायचे ठरवले व त्यामध्ये दुग्ध व पोल्ट्री व्यवसायाची निवड करून आज या व्यवसायांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
उच्चशिक्षित असून नोकरी न करता धरली शेती आणि दुग्ध व्यवसायाची कास
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोला जिल्ह्यात असलेल्या डोंगरगावचे रहिवाशी कौस्तुभ शिरीष देशमुख यांनी बीई एमटेक( इलेक्ट्रिकल्स) मध्ये पूर्ण केलेले आहे. परंतु नोकरीच्या मागे न लागता शेती करावी व शेतीला जोडधंदा करावा असा मनात विचार केला व त्या पद्धतीने पावले टाकायला सुरुवात केली.
शेतीला जोडधंदा सुरू करताना त्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केली. या व्यवसायाची सुरुवात फक्त तीन म्हशी विकत आणून केली. हळूहळू या व्यवसायात चांगले यश मिळवत टप्प्याटप्प्याने व्यवसायाचा विस्तार करायला सुरुवात केली. दुधाची मागणी वाढू लागली तशी तशी म्हशी विकत घ्यायला सुरुवात केली.
आज त्यांच्याकडे 40 ते 45 म्हशी असून या म्हशीचे व्यवस्थापनासाठी त्यांनी उत्तम असे नियोजन केलेले आहे. आज दिवसाला 250 ते 300 लिटर दुधाची विक्री ते करतात.
म्हशीसाठी त्यांनी 35 बाय 50 फूट आकाराचे तीन शेड बांधले असून त्यामध्ये उन्हाळ्यात उष्णतेच्या होणाऱ्या त्रासापासून म्हशीचा बचाव व्हावा म्हणून कुलर तसेच पंख्यांची सोय केलेली आहे. दररोज होणाऱ्या 250 ते 300 लिटर दूध उत्पादनातून त्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळते.
दुग्ध व्यवसायासोबतच सुरू केला पोल्ट्री व्यवसाय
शेती तसेच दुग्ध व्यवसाय सुरू असताना पोल्ट्री फार्म म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसायाला देखील त्यांनी सुरुवात केली. कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात करताना त्यांनी अगोदर फक्त दोन ते अडीच हजार पक्षी मावतील या आकाराचे साध्या पद्धतीचे शेड उभारले व अमरावती येथील कंपनीशी करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग व्यवसायाला सुरुवात केली.
पुढे यामध्ये देखील चांगली प्रगती करत त्यांनी संपूर्णपणे एसी शेडचे बांधकाम केले. यामध्ये सगळ्या प्रकारची यंत्रणा ही ऑटोमॅटिक असून पोल्ट्री मधून वाढीव उत्पादन मिळवण्यासाठी या यंत्रणेचा खूप मोठा फायदा त्यांना होत आहे.
कुक्कुटपालन व्यवसायात विजेची समस्या येऊ नये म्हणून शेड जवळ 63 केव्हीची डीपी बसवली असून एखादा वेळेस अचानकपणे विद्युत पुरवठा खंडित झाला व त्यामुळे नुकसान होऊ नये याकरिता 63 केवीचे जनरेटर देखील त्यांनी बसवलेले आहे.
सोबतीला तीन-चार मजूर असून त्यांच्या मदतीने दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री व्यवसायाचे नियोजन ते उत्तम पद्धतीने करतात. शेती तसेच दुग्ध व पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून कौस्तुभ हे लाखो रुपये कमवत आहेत.