Bank FD:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीची सुरक्षितता आणि गुंतवणुकीवर मिळणारा परतावा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात व या गोष्टींचा विचार करूनच गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठीचा पर्याय निवडत असतात. या दोन्ही निकषांवर जर आपण बघितले तर बँकांच्या मुदत ठेव योजनांना गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.
जवळपास प्रत्येक बँकेत मुदत ठेव म्हणजेच एफडी करता येते. परंतु आपण जेव्हा कोणत्याही बँकेमध्ये मुदत ठेव म्हणजेच एफडी करायला जातो तेव्हा बँक आपल्याला काही गोष्टींची माहिती देत नाही? त्यामुळे गुंतवणूकदारांनी एफडी करण्या अगोदर काही गोष्टी बँकेला विचारून घेणे फायद्याचे ठरते. या लेखात आपण मुदत ठेव किंवा एफडी करताना बँक साधारणपणे कोणत्या गोष्टींची माहिती देत नाहीत? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
बँकेत एफडी करता परंतु बँक तुम्हाला या गोष्टी सांगते का?
1- गुंतवलेल्या पैशांची सुरक्षितता– साधारणपणे कुठल्याही बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणे खूप सुरक्षित आहे. परंतु एखाद्या वेळी बँकेला जर डिफॉल्टर घोषित केले गेले तर मात्र तुमचे गुंतवणुकीचे काय? त्याबद्दल बँक तुम्हाला कधीही माहिती देत नाही.
अशी परिस्थिती निर्माण झाली तर एफडी केलेल्या गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची शक्यता असते. कारण नियमानुसार एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे अशा परिस्थितीत केवळ पाच लाख रुपये सुरक्षित राहतात. कारण DICGC च्या माध्यमातून बँकेच्या ठेवींचा विमा फक्त पाच लाख रुपयांपर्यंत आहे.
तुमची कितीही गुंतवणूक एफडी मध्ये असेल तरी तुम्हाला बँक जर डिफॉल्टर झाली तर फक्त पाच लाख रुपये परत मिळू शकतात. ही पाच लाख रुपयांची हमी फक्त एफडीच्या पैशावरच नाही तर बँकेत तुमच्या नावावर बचत खाते,
चालू खाते तसेच आरडी खाते असेल तर या खात्यांमधील जमा केलेल्या रकमेवर देखील हा नियम लागू होतो. म्हणजेच सर्व मिळून तुमच्या फक्त पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमी मिळते व जर यापेक्षा जास्त पैसे असतील तर मात्र तुमचे पैसे बुडतात.
2- एफडीवर मिळणाऱ्या व्याजावर कर– आपण जे काही एफडी केलेली असते व त्यावर बँकेच्या माध्यमातून जे काही व्याज मिळते त्या व्याजावर देखील आयकर रिटर्न भरताना कर भरावा लागतो व बँक याबद्दल कधीच तुम्हाला माहिती देत नाही. त्यामुळे एफडी शिवाय अशा अनेक योजना आहेत की ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर मिळणाऱ्या व्याजावर कर लागत नाही.
3- मिळणाऱ्या व्याजावर तोटा होण्याची शक्यता– तुम्ही जेव्हा एफडी करतात तेव्हा त्या रकमेवर एफडीचा जेवढा कालावधी असेल तेवढा कालावधी करिता समान दराने व्याज मिळते. अशावेळी तुम्ही जर दीर्घ कालावधी करिता एफडीमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते.
नंतर बँकेने एफडी वरील व्याजदरामध्ये सुधारणा केली तरी देखील अनेक वेळा तुम्हाला बँकेकडून वाढीव व्याजदराचा लाभ मिळत नाही. ही बाब देखील बँका बऱ्याचदा गुंतवणूकदारांना सांगत नाहीत.
4- दंड देखील भरावा लागू शकतो– समजा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये एफडीत गुंतवणूक केलेली आहे व तिचा ठराविक कालावधी आहे. मध्येच तुम्हाला जर काही आर्थिक गरज उद्भवली व तुम्ही कालावधी पूर्ण होण्याआधीच पैसे काढले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो व वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून ही दंडाची रक्कम वेगवेगळी असू शकते.
एफडी शिवाय इतर गुंतवणुकीचे पर्याय आहेत उपलब्ध
एफडीत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या इतर गुंतवणुकीचे चांगले पर्याय माहित असणे खूप गरजेचे आहे.
उदाहरणच घ्यायचे झाले तर म्युच्युअल फंड सारख्या पर्यायांमधील गुंतवणूक ही एफडी मधील गुंतवणुकीपेक्षा थोडी जोखमीची आहे, परंतु म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एफडी पेक्षा जवळपास 12 ते 20 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळू शकतो.