स्पेशल

चर्चा तर होणारच ! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने पिकवला तब्बल 5 किलोचा मुळा; कशी साधली ही किमया, पहा सविस्तर

Published by
Ajay Patil

Beed Farmer News : मराठवाडा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उभ राहत ते भयान दुष्काळाचे चित्र. येथील शेतकरी दुष्काळामुळे पुरता भरडला जात आहे. बीड जिल्ह्यातही मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वारंवार दुष्काळ बघायला मिळतो. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून या नैसर्गिक संकटावर देखील मात केली आहे. दुष्काळ असतानाही येथील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतल आहे.

येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आता आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. दरम्यान जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने आपल्या शेतात पाच किलो वजनाचा मुळा उत्पादित करण्याची किमया साधली असून सध्या या शेतकऱ्याची ही कामगिरी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

शिरूर तालुक्यातील मौजे कोळेवाडी येथील ज्ञानदेव शेषराव नेटके या प्रयोगशील शेतकऱ्याने भुईमुगाच्या पिकात आंतरपीक म्हणून मुळ्याची लागवड केली होती. या आंतरपीकातून प्राप्त झालेल्या एका मुळ्याचे वजन तब्बल पाच किलो भरले आहे. यामुळे परिसरात नेटके यांची मोठी चर्चा पहावयास मिळत आहे. नेटके यांना 5 किलो वजनाचे एकूण 15 मुळे अर्धा गुंठे जमिनीतून मिळाले असून इतर मुळ्यांचे वजनही तुलनेने अधिकच आहे.

नेटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अडीच एकरात भुईमुगाची लागवड केली आहे. या भुईमूग मध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून मुळा देखील लावला आहे. जवळपास अर्धा गुंठ्यात त्यांनी मुळ्याची लागवड केली आहे. वास्तविक, मुळ्याचे वजन हे 250 ग्रॅम किंवा एक किलोच्या दरम्यान असते. पण नेटके यांनी लावलेल्या मुळा पिकातून पाच किलो वजनाचे मुळे निघाले आहेत.

सुरुवातीला त्यांनी एक मुळा उपटला आणि या मुळ्याचे वजन हे नेहमीपेक्षा अधिक भासले. यामुळे त्यांनी संपूर्ण मुळे उपटून काढलेत. यात त्यांना 15 मुळे पाच किलो वजनाचे आढळून आले आहेत. परिसरात या गोष्टीची माहिती होताच इतर शेतकऱ्यांनी नेटके यांचे शेत जवळ केल आहे. परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी नेटके यांची मुळ्याची शेती पाहिली आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांनी देखील या पिकाची पाहणी केली आहे.

नेटके सांगतात की, मुळ्याची लागवड केल्यानंतर त्यांनी संपूर्ण सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. शेणखत तसेच सुपर फॉस्फेट आणि 10 26 26 या खताचा देखील वापर त्यांनी केला आहे. अशा पद्धतीने खत व्यवस्थापन आणि योग्य पाण्याचे व्यवस्थापन झालं असल्याने मुळ्याचे एवढे वजन तयार झाल्याचे मत नेटके यांनी व्यक्त केल आहे. निश्चितच परिसरात नेटके यांच्या या मुळ्याच्या शेतीची चर्चा रंगत आहे.

Ajay Patil