Marathi News : चंद्र हा निसर्गाचा आणि मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा असा भाग बनला आहे. धार्मिक-सांस्कृतिक समजुतीबरोबरच अनेक पौराणिक कथांमध्ये चंद्राचा समावेश आहे.
चंद्रावर गेल्या ६४ वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या विविध मोहिमांमुळे पृष्ठभागाचा आकार बदलत आहे, असे एका संशोधनामध्ये स्पष्ट झाले.
जुलै १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर उतरणारा पहिला मानव म्हणून इतिहास रचला. यानंतर आजअखेर अनेक मोहिमांसाठी जगभरातून जणू स्पर्धाच सुरू झाल्या.
यामधील काही मोहिमा फतेह तर काही अपयशी झाल्या, पण या मोहिमा झाल्यानंतर ज्या काही वस्तू चंद्राच्या पृष्ठभागावर राहिल्या त्यामुळे चंद्राच्या आकारमानामध्ये बदल होऊ लागला. याला जबाबदार केवळ अन् केवळ मानवी हस्तक्षेपच असल्याचे या अभ्यासामध्ये नमूद केले आहे.
एकूणच, मानवाने आजअखेर आमच्या या ‘चांदोबा’वर सुमारे ५०,०००० पौंड मानवी कलाकृती वितरित केल्या आहेत. यामध्ये ७० हून अधिक वजनदार अंतराळ यान वाहनांचाही समावेश आहे की, जी पृथ्वीवर परत आणणे केवळ अशक्य आहे.
याशिवाय काही अंतराळवीरांनी त्यांच्या गंतव्यस्थानी (इस्पितस्थळी) पोहोचल्यानंतर त्यांनी टाकलेला कचरा प्रत्येक मोहिमेनंतर वाढतच गेला आहे. यामध्ये अन्नाच्या पॅकेजिंगपासून ते अगदी ओल्या पुसण्या-मानवी मलमूत्रांची पॅकेट्स,
वापर संपल्यानंतरची उपकरणे, चांद्रमोहिमा आखलेल्या देशांनी रोवलेले ध्वज यांचाही समावेश आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर होत असलेल्या या बदलांना ‘लूनर अंथ्रोपोसिन’ या नावाने ओळखले जाते.
लॉरेन्स येथील ‘कंसास’ सार्वजनिक संशोधन विद्यापीठामधील पुरातत्त्व विभागाचे संशोधक जस्टिन होलकॉम्ब यांच्या ‘नेचर जिओसायन्स’ या शोधनिबंधामध्ये चंद्रावरील बदलांबाबत अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत.
यामध्ये चंद्राचा जो नैसर्गिक आकार होता त्यामध्ये वारंवार होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे बदल होत आहे आणि हे निश्चितच धोकादायक आहे. कारण मोहिमांनंतर राहिलेल्या अनेक वस्तू या चंद्रावरच टाकल्यामुळे पृष्ठभागावर कचरा वाढत आहे.
याशिवाय वेगवेगळी रॉकेट्स, स्पेसक्राफ्ट्स, रोव्हर ट्रॅक, युक्लिअरच्या करण्यात आलेल्या चाचण्या, गोल्फ बॉल, पायांचे ठसे आदीमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर खड्डे होण्याचे प्रमाण वाढत आहे, यासह अनेक कारणांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
जस्टिन हॉलकॉम्ब यांचे सूचक इशारे….
चंद्रावर राहण्याची स्वप्ने मानव पाहत आहे, पण तत्पूर्वी तेथे असलेला कचरा साफ करणे आवश्यक आहे.
कारण चंदद्रावर वातावरण नसल्याने तो वादळ वारे किंवा जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तो साचलेला कचरा कुठेतरी जाईल हे अशक्य आहे.
भविष्यामध्ये चांद्रमोहिमांमध्ये प्रचंड वाढ होत जाईल आणि त्याबरोबरच कचराही वाढेल आणि हे धोकादायक ठरेल.
पृथ्वी आणि चंद्राप्रमाणे मानव हा इतर ग्रहांवरही जाउ शकेल, पण त्यांना कोणतीही हानी पोहचणार नाही याची जबाबदारी मानवालाच घ्यावी लागेल.
अन्यथा संपूर्ण मानवजातीसाठी अशा मोहिमा त्रासदायक ठरतील