स्पेशल

राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा! शिक्षकांच्या पगारामध्ये होणार 20 टक्के वाढ? शिक्षण विभागाने मागितली माहिती

Published by
Ajay Patil

Salary Increase Of Teachers:- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर महाराष्ट्रातील सुमारे 50 हजार शिक्षकांना 20 टक्के अनुदानात टप्पा वाढ देण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे या निर्णयाची शिक्षकांमध्ये प्रतीक्षा होती.

त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले व आचारसंहिता देखील संपली. त्यामुळे आता आचारसंहितेपूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे काय होणार किंवा हा निर्णय कधी घेतला जाईल?

याबाबत शिक्षकांमध्ये प्रतीक्षा होती व आता आचारसंहिता संपताच शिक्षकांना 20 टक्के अनुदानात टप्पा वाढ देण्यासंदर्भात हालचाली गतिमान झाल्यामुळे शिक्षकांना खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळाला आहे.

इतकेच नाही तर राज्याच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून गुरुवारी या संदर्भात पत्र काढून टप्पा वाढीसाठी राज्यातील पात्र शाळांची यादी व माहिती मागवल्याने या मुद्द्याला आता चालना मिळू शकते अशी एक शक्यता आहे.

राज्यातील शिक्षकांच्या पगारात होणार 20 टक्के वाढ?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर १४ ऑक्टोबर रोजी शासनाने शिक्षकांच्या अनुदानात टप्पा वाढीचा निर्णय घेतला होता व त्यामुळे राज्यातील जवळपास 49 हजार 562 शिक्षकांच्या पगारामध्ये 20 टक्के वाढ होणार अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता.

परंतु मनामध्ये शंका होती की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय निवडणुकीचा जूमला तर नाही ना व त्यामुळेच आता आचारसंहिता संपल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष लागलेले होते. यापूर्वी या बाबतीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा इतिहास बघितला तर शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी सन 2016 मध्ये 20 टक्के अनुदान दिले व पुढे 2020 मध्ये 40 तर 2022 मध्ये 60 टक्के पर्यंत ते वाढवण्यात आले.

राज्यातील बऱ्याच शाळा 20 टक्क्यांवरच होत्या. उच्च माध्यमिक शाळांना 2020 मध्ये 20 टक्के अनुदान व 2022 मध्ये 40 टक्के अनुदान दिले त्यानंतर मात्र अनुदान टप्पा वाढीचे आश्वासन देऊन देखील टप्पा वाढ करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अर्धवेतनावर राज्यात जे शिक्षक काम करत होते त्यांची मात्र हेळसांड सुरू असल्याचे चित्र होते.

याबाबतचा निर्णय घेण्यास शासन दिरंगाई करत असल्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षकांनी आंदोलन पुकारले होते तर शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी या प्रश्नावर सभागृहामध्ये आवाज देखील उठवला होता.

एक जून पासून मिळणार शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने वाढीव अनुदान
आता या निर्णयामुळे शिक्षकांच्या पगारांमध्ये 20% वाढ होणार आहे. म्हणजेच जे शिक्षक 20% वेतन घेतात त्यांना 40%, 40% वेतन घेणाऱ्यांना 60% आणि 60 टक्के वेतन घेणाऱ्या शिक्षकांना 80% वेतन आता मिळणार आहे.

साधारणपणे एक जून पासून पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षकांना वाढीव अनुदान मिळणार आहे. अर्थात तोपर्यंत शिक्षकांना याबाबत मात्र प्रत्यक्षात करावी लागणार आहे.

दहा डिसेंबर पर्यंत द्यावी लागणार संपूर्ण माहिती
गुरुवारी शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी डॉ.स्मिता देसाई यांनी शिक्षण आयुक्तांना तर शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून शासन निर्णयाप्रमाणे सर्व शाळा व शिक्षकांची यादी ताबडतोब मागवली

असून दहा डिसेंबर पर्यंत ही माहिती जमा करण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्याने या वाढीव अनुदान टप्पा वाढीला चालना मिळाली आहे व त्यामुळे आता शिक्षकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे अर्ध वेतनावर काम करणाऱ्या नाशिक विभागातील 7000 शिक्षकांना 20 टक्के पगारवाढीचा लाभ मिळणार आहे.

Ajay Patil