स्पेशल

Business Idea : शेतकऱ्यांनो, 2 लाख खर्च करून ‘या’ जातीच्या मशरूमची शेती सुरू करा, 15 लाखांच उत्पन्न मिळवा ; आधी आर्थिक गणित समजून घ्या

Published by
Ajay Patil

Business Idea : भारतात अलीकडे शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधव आता केवळ पारंपारिक पिकांची शेती करत आहेत असं नाही तर मशरूम, पर्ल फार्मिंग यांसारख्या शेतीकडे देखील आता शेतकऱ्यांचा मोठा ओघ आहे. विशेष म्हणजे या शेतीमधून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. दरम्यान आज आपण मशरूमच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत.

आज आपण एका विशेष जातीच्या मशरूमच्या शेती विषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं पाहता आज आपण ज्या जातीच्या मशरूम विषयी जाणून घेणार आहोत ते मशरूम आपल्याकडे विशेष असे उत्पादित होत नाही. मात्र, अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांनी या मशरूमची देखील शेती सक्सेसफुल करून दाखवली आहे.

आज आपण ज्या मशरूम विषयी जाणून घेणार आहोत त्या मशरूमचे नाव आहे ब्ल्यू ऑईस्टर मशरूम. या मशरूम मध्ये असणारे औषधी गुणधर्म पाहता अलीकडे बाजारात याची मागणी वाढली आहे परिणामी आता लागवड देखील वाढवली जात आहे.

विशेष म्हणजे मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने या जातीच्या मशरूम शेतीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या जातीच मशरूम कशा पद्धतीने उत्पादित होऊ शकतं आणि यातून शेतकऱ्यांना किती आणि कसा नफा मिळू शकतो. 

ब्लु ऑयस्टर मशरूमचे उत्पादन कसे घेतले जाते बरं…!

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लु ऑयस्टर मशरूम वाढवण्यासाठी गवताचा पेंढा किंवा मक्याची देठ याचे लहान तुकडे करून पाण्यात भिजवले पाहिजेत. जेणेकरून त्यात 75-90 टक्के ओलावा टिकून राहील. नंतर मग त्यावर फॉर्मेलिन (0.5 टक्के) आणि कार्बेन्डाझिम (0.075 टक्के) द्रावणाने उपचार केले पाहिजे. यावर उपचार केल्यानंतर सुमारे 18 तास ते तसेच सावलीत ठेवले जाते.

म्हणजे आपण इतर पिकाचे बियाणे पेरणीपूर्वी ज्या पद्धतीने बीजोपचार करतो त्या पद्धतीने या पेंढ्यावर उपचार करणे आवश्यक आहे. बीजोपचाराची क्रिया झाली की मग पेंढा बाहेर काढला जातो आणि प्लास्टिकच्या आसनावर किंवा स्वच्छ तारांच्या जाळीवर पसरवला पाहिजे. यामुळे पेंढ्यांमधील अतिरिक्त पाणी हे बाहेर निघत.

यानंतर मग पेंढा पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरला जातो. यानंतर मग मशरूम बीजची पेरणी केली जाते. यानंतर मग त्या पिशवीचे तोंड नायलॉनच्या दोरीने बांधले जाते. पिशवीमध्ये 10-15 छिद्रे केली जातात. मग या पिशव्या एका वातानुकुलीत खोलीत ठेवल्या जातात. खोलीचे तापमान 20-30 डिग्री सेल्सियस असले पाहिजे, असे जाणकार नमूद करतात.

शिवाय पिशवीतील ओलावा पातळी 70-80 टक्के राखली गेली पाहिजे. यामुळे मशरूमचे चांगले यशस्वी उत्पादन मिळते. हे मशरूम सहसा गुच्छांमध्ये वाढतात आणि फिकट निळ्या रंगाचे असतात, मात्र पिकल्यावर हे मशरूम देखील ऑईस्टर मशरूम प्रमाणे पांढरे होतात.

ब्लू ऑयस्टर मशरूमपासून किती दिवसानंतर उत्पादन मिळतं बरं…..!

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मशरूम 23-24 दिवसांनी पूर्णपणे तयार होत असतात. म्हणजे साधारणता एका महिन्यात मशरूम पासून आपल्याला उत्पादन मिळते. आता मशरूम काढणी केल्यानंतर तो फ्रिजमध्ये ३-४ दिवस ठेवता येतो. म्हणजेच याची साठवणूक क्षमता देखील चांगली म्हणता येईल. दरम्यान या जातीच्या मशरूम पासून 2 किलो प्लास्टिकच्या पिशवीतून 30-40 मशरूम मिळत असतात. आता आपण या जातीच्या मशरूम पासून प्रत्यक्ष किती उत्पादन मिळू शकतो आणि किती खर्च होऊ शकतो याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. 

ब्लू ऑयस्टर मशरूमपासून किती उत्पन्न मिळेल बरं….!

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या मशरूमची दोन किलोची पिशवी तयार करण्यासाठी 20-25 रुपये खर्च येतो आणि या पिशवीमधून सुमारे 1-1.5 किलो मशरूम मिळतात. या जातीच्या मशरूमला बाजारात 150 ते 200 रुपये प्रति किलो दरम्यान भाव मिळू शकतो. अशा प्रकारे एक किलोवर 130-175 रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. म्हणजेच दोन लाखांचा खर्च करून जवळपास 15 लाखांपर्यंतचे उत्पन्न या मशरूम पासून मिळवलं जाऊ शकत. अर्थातच उत्पादन खर्च काढून तेरा लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळेल ज्यावेळी दोन लाख रुपये खर्च होतील.

Ajay Patil