Chana Cultivation : सध्या रब्बी हंगामाची तयारी सुरू असून पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी बंधू रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीकरता तयारी करताना दिसून येत आहेत. यामध्ये जर आपण विविध पिकांचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी मका तसेच रब्बी कांद्याची तयारी केली जात आहे.
रब्बी कांद्याच्या दृष्टिकोनातून रोपवाटिका टाकण्याचा हा कालावधी आहे तर काही ठिकाणी ज्वारी पेरणी देखील केली जात असल्याचे चित्र आहे. यामध्ये जर आपण कडधान्यवर्गीय पिकांचा विचार केला तर हरभरा हे पीक देखील रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच भागात घेतले जाते.
हरभरा पिकाच्या दृष्टिकोनातून आता अनेक नवीन वाण विकसित करण्यात आलेले असून ते खूप चांगले उत्पादनक्षम असे वाण आहेत. या वानांपासून भरघोस उत्पादन मिळवण्याकरिता दोन झाडातील अंतर किंवा दोन ओळींमध्ये अंतर जर योग्य पद्धतीने ठेवले तर हमखास उत्पादनात वाढ होणे शक्य आहे. याचा अनुषंगाने आपण हरभरा पेरणीसाठी काही महत्त्वाच्या पद्धती म्हणजे सुधारित पेरणी पद्धती पाहणार आहोत ज्यामुळे शेतकरी बंधूंना फायदा होऊ शकतो.
हरभरा पिकाच्या पेरणीकरिता सुधारित पद्धती
1- बीबीएफ प्लांटरने हरभरा पेरणी- हरभरा पेरणीसाठी तुम्ही बीबीएफ प्लांटर चा वापर करू शकतात. जर तुम्ही हरभऱ्याची पेरणी बीबीएफ प्लांटरच्या साह्याने केली तर प्रत्येक चार हरभऱ्याच्या ओळीनंतर दोन्ही बाजूंना सऱ्यादेखील पडतात. म्हणजेच पाणी व्यवस्थापन करताना तुम्हाला तुषार सिंचन किंवा सरीच्या माध्यमातून पाणी देणे शक्य होते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाची जी काही बऱ्याचदा समस्या उद्भवते त्यामुळे होणारे पिकांचे नुकसान देखील टाळण्यास मदत होते. या पद्धतीने पेरणी केल्यास पाचवी ओळ ही रिकामी राहिल्यामुळे बियाण्याचे प्रमाण व खर्च यामध्ये बचत होते.
2- ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी यंत्राच्या माध्यमातून पट्टा पेर पद्धत- या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे पट्टा पेर करता येते. जसे की…
सहा किंवा सात ओळी पट्टापेर- हरभरा देखील तुम्हाला पट्टापेर पद्धतीने पेरता येतो. म्हणजेच हरभऱ्याच्या पेरणी करता तुम्ही जे काही ट्रॅक्टर चलीत पेरणी यंत्र वापरतात ते सामान्यतः सहा दात्यांचे असते. या माध्यमातून ट्रॅक्टरने पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर जेव्हा फिरून येते म्हणजेच पलटून येते तेव्हा आणि परत जाताना सातवी ओळ खाली ठेवावी. या पद्धतीमुळे सहा सहा ओळींच्या पट्ट्यात पेरणी होते व प्रत्येक सातवी ओळ खाली राहते व त्यामुळे बियाणे व रासायनिक खतांच्या खर्चामध्ये बचत होते.
चार ओळींची पट्टा पेर पद्धत- यामध्ये देखील ट्रॅक्टरचलीत सहा दात्यांच्या पेरणी यंत्राचे दोन्ही काठावरील प्रत्येक एक छीद्र बोळा वगैरे लावून ते बंद केले जाते. असे केल्यामुळे पेरणी करताना आपोआप काठावरील ओळी खाली राहतात. पेरणी करताना ट्रॅक्टर जेव्हा फिरून म्हणजेच पलटून येते व परत जाते तेव्हा खाली ठेवलेल्या ओळीतच पेरणी यंत्राचे शेवटचे दाते ठेवावे लागते. त्यामुळे आपोआप प्रत्येक चार ओळींनंतर पाचवी ओळ रिकामी राहते व त्यामुळे एक हलकीशी सरी त्या ठिकाणी तयार होते. या पद्धतीमध्ये देखील रासायनिक खते व बियाण्यामध्ये 20 टक्क्यांपर्यंत बचत होते.
3- लहान ट्रॅक्टर किंवा चार किंवा पाच दाती पेरणी यंत्राने पेरणी- जर तुमच्याकडे लहान ट्रॅक्टर असेल तर चार किंवा पाच दाती पेरणी यंत्राने चार अथवा पाच ओळींच्या पट्ट्यात हरभरा पिकाची पेरणी करता येते. याकरिता चार दाती पेरणी यंत्राने पेरणी करण्याकरिता तुम्हाला प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व ते परत जाताना पाचवी ओळ खाली राहील याची काळजी घ्यावी लागते किंवा तितकी जागा सोडावी लागते. जर पेरणी यंत्र हे पाच दात्यांचे असेल तर प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व परत जाताना सहावी ओळ ही खाली राहील एवढी जागा तुम्हाला मोकळी सोडणे गरजेचे असते. म्हणजेच तुम्हाला शेतामध्ये चार ते पाच ओळींच्या पट्ट्यामध्ये पेरणी करता येते.
4- छोटे ट्रॅक्टर व पाच दाती पेरणी यंत्राने पेरणी- पाच दाती पेरणी यंत्राने पेरणी करायची असेल तर यामध्ये तुम्हाला बियाणे व खत कप्प्यामधील जे काही छीद्र म्हणजे होल असतात त्यातील तीन नंबरचे होल बंद करणे गरजेचे असते. पेरणी सुरू करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व परत जाताना पेरणीच्या दोन ओळींमधील अंतरानुसार एक ओळ खाली सुटेल एवढी जागा मोकळी ठेवणे गरजेचे आहे. या माध्यमातून तुम्हाला जोड ओळ पद्धतीने पेरणी करता येणे शक्य आहे. या पद्धतीत तुम्ही 33 टक्यांपर्यंत खर्चात व रासायनिक खते व बियाण्यात बचत करू शकतात.