Chana Procurement : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता रब्बी हंगामात आपल्याकडे हरभरा मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. या रब्बी हंगामात देखील हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. सध्या हरभरा काढणी प्रगतीपथावर असून बहुतांशी शेतकरी बांधव काढणीनंतर आपला शेतमाल विक्री करत आहेत.
मात्र बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने नाफेडमार्फत हरभरा खरेदी लवकरात लवकर सुरू व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती. या पार्श्वभूमीवर नाफेड मार्फत हरभरा खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने 27 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. वास्तविक यासाठी 15 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.
परंतु शेतकऱ्यांनी नाफेड मार्फत खरेदीसाठी अधिकचा प्रतिसाद दाखवला यामुळे नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. जवळपास पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असून आता 31 मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीने शेतकरी बांधवांना यासाठी नोंदणी करता येणार आहे. निश्चितच राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय राज्यातील हरभरा उत्पादकांसाठी दिलासा देणारा आहे.
वास्तविक यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. परिणामी बाजारात हरभऱ्याची आवक सुरुवातीलाच वाढली यामुळे आवकेचा दबाव दरावर तयार झाला. अशा परिस्थितीत हरभरा हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होऊ लागला. त्यामुळे निदान हमीभावात तरी मालाची विक्री व्हावी या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा हित अनेक शेतकरी संघटनांकडून लवकरात लवकर नाफेडची खरेदी सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झालेत.
शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे मागणी करण्यात आली.शासणाने ही मागणी ध्यानात घेऊन लवकरात लवकर हरभरा खरेदी सुरू करण्यासाठी आदेश निर्गमित केलेत. या पार्श्वभूमीवर आता नाफेडच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे.
ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करताना शेतकऱ्यांना काही अडचणी देखील येत होत्या. यामुळे यासाठी मुदतवाढ दिली जावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेऊन शासनाने नाफेडच्या शासकीय हरभरा खरेदीसाठी आवश्यक ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली असून आता 31 मार्च 2023 पर्यंत शेतकऱ्यांना यासाठी नोंदणी करता येणार आहे.