बरेच व्यक्ती कितीही अडचणीची परिस्थिती राहिली किंवा आयुष्यामध्ये कितीही खचून जाण्याचे प्रसंग उद्भवले तरी त्यातून सावरतात व मोठी झेप घेण्यासाठी सरसावतात. ध्येय पूर्ण करण्यासाठी जर प्रचंड इच्छाशक्ती मनामध्ये असेल तर अशा व्यक्तींना कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती अटकाव घालू शकत नाही हे मात्र निश्चित.
फक्त आपल्या मध्ये काम करण्याची उर्मी व आहे ती परिस्थितीमध्ये सुधार करण्याची ताकद असली तर माणूस आपोआपच मोठ्या नेटाने आणि जोमाने ध्येयाकडे वाटचाल करतो. याच पद्धतीने जर अमरावती जिल्ह्यातील घुसळी या गावच्या छाया देशमुख या ताईंची यशोगाथा पाहिली तर ती संघर्षाने व धैर्याने भरलेली आहे.
पती-पत्नी मधील कौटुंबिक वाद टोकाला गेला व पतीपासून विभक्त राहण्याची वेळ आली. परंतु तरीदेखील न डगमगता माहेरी कडच्या कुटुंबाच्या मदतीने आणि स्वतःच्या हिमतीने त्यांची आज यशस्वी दुग्ध व्यवसायिक म्हणून पंचक्रोशीत ओळख तयार झालेली आहे. त्यांचेच यशोगाथा या लेखक आपण बघणार आहोत.
छायाताईंचा खडतर प्रवास
पती-पत्नी मधील कौटुंबिक वाद व त्यामुळे पतीपासून वेगळे राहण्याची वेळ छाया देशमुख यांच्यावर आली. परंतु तरीदेखील न हारता आज त्यांनी यशस्वी दुग्ध व्यवसाय व प्रशिक्षक म्हणून नाव मिळवले आहे. अमरावती पासून जवळ असलेले कामनापूर या ठिकाणी छाया देशमुख राहतात. या परिसरामध्ये छाया देशमुख यशस्वी दुग्ध व्यवसायिक म्हणून ओळखले जातात. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ते त्यांच्या आई रेखा यांच्यासोबत अमरावती या ठिकाणी राहिला आल्या.
तेव्हा त्यांनी उदरनिर्वाह करिता घरगुती खानावळ व्यवसाय सुरू केला. 2001 ते 2019 असे 19 वर्ष हा व्यवसाय त्यांनी केला व शंभर मुलांचा स्वयंपाक त्यामध्ये मधून त्या करायच्या. या संघर्षाच्या प्रवासात त्यांच्या सोबत त्यांचा एकुलता एक मुलगा यश हा होता व तो चांगला शिकावा व त्याला चांगले शिक्षण मिळावे याकरिता छायाताईंची खूप मोठी धडपड सुरू होती. याकरिता त्यांनी यशला भोसला मिलिटरी स्कूल नागपूर येथे प्रवेश मिळवून दिला.
त्याच्या शिक्षणासाठी शाळेचे 40 हजार रुपये फी व इतर खर्च असे 50 हजार कर्ज काढून त्यांनी भरले आणि यशने देखील आईच्या धडपडीची व कष्टाची जाणीव ठेवत सैनिकी शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला व तो आज 24 वर्षांचा झाला असून राजस्थान मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे. त्यांचा खानावळीचा व्यवसाय चांगला चालत असतानाच मध्ये कोरोना आला व हा व्यवसाय बंद पडला खाजगी कंपन्यांकडून घेतलेले कर्ज परतफेड करणे देखील त्यांना कठीण झाले.
ज्या घरात ते भाड्याने राहत होते व तेच घर त्यांनी कर्ज व व्यवसायातील पैशांमधून विकत घेतले होते व पुढे फायनान्स कंपन्यांकडे ते घर गहाण असल्याने ते विकून पैसे द्यावे लागले. परंतु या प्रसंगी देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना आधार दिला व चांदूर रेल्वे या ठिकाणी त्यांच्या नावे असलेला प्लॉट त्यांनी विकला व दुग्ध व्यवसाय उभा करण्याच्या ठरवले.
अशा पद्धतीने रोवली दुग्ध व्यवसायाचे मुहूर्तमेढ
प्लॉट विक्री केल्यातून जे काही पैसे आले त्या माध्यमातून त्यांनी यांच्या वडिलांच्या अडीच एकर शेतामध्ये 40 बाय 30 फूट आकाराचा गोठा उभारला व चार लाख रुपये त्यासाठी खर्च केला. भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून एक लाख रुपयांची सोय केली व त्यातून एचएफ व जर्सी गाईंची खरेदी केली. या गाई व घरच्या काही गाई मिळून दररोज 40 लिटर पर्यंत दूध संकलन सुरू झाले.
या माध्यमातून त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड तसेच कौटुंबिक गरजांसाठी लागणारा पैसा त्यांना उपलब्ध झाला. परंतु खर्चाचा ताळमेळ काही केल्या बसत न होता व तीन वर्ष व्यवसाय तोट्यातच होता. नंतर त्यांच्या साथीला त्यांना मदत म्हणून त्यांची बहीण वैशाली उभ्या राहिल्या व त्यांनी मंगळसूत्र गहाण ठेवत पैसे उभे केले.
असे करत करत आज त्यांच्याकडे 12 गाई असून सर्व सत्तर लिटर दुधाचे संकलन आहे व त्याला प्रतिलिटर 35 ते 40 रुपये एवढा दर मिळत आहे. हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्यांनी अनेक बाबींचा अवलंब केला आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केला तसेच पाण्याचा हौद याकरता 80 हजार रुपयांचा खर्च होता
त्यामुळे हा खर्च परवडण्यासारखा नसल्यामुळे त्यांनी आठशे रुपयांना एक याप्रमाणे छोटे तयार सिमेंटचे टॅंक आणून गाईंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली व खर्चामध्ये बचत केली. सिमेंटच्या गव्हाणी न बांधता त्यांनी प्लास्टिक ड्रम चा वापर करून गव्हाणी उभ्या केल्या व 70000 रुपयांचा खर्च त्याकरिता आला. गाईंना चाऱ्याची व्यवस्था व्हावी याकरिता दोन एकर मध्ये चारा पिकांचे नियोजन केले. अशा पद्धतीने प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी सर्व संकटांवर यशस्वी मात केली व आज त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनले आहे.