स्पेशल

चीनची हवाई टॅक्सी पोहोचली दुबईत ! किंमत आहे तब्बल…

Published by
Ahmednagarlive24 Office

Air Taxi : चीनची फ्लाइंग टॅक्सी उत्पादक कंपनी ईहांगने मध्यपूर्वेतील पहिल्या उडणाऱ्या टॅक्सीचे उड्डाण यशस्वी केले. ईएच २१६-एस या ईहांगच्या फ्लॅगशिप पायलटलेस इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग व्हेईकलने (ईव्हीटीओएल) अबुधाबीमध्ये उड्डाण केले.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक हजार मीटर उंचीपेक्षा कमी उंचीवर ही टॅक्सी उडणार आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि मध्य पूर्वेच्या इतर भागांमध्ये पायलटलेस विमानांसह व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची ईहांगची योजना आहे, असे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हू हुआझी यांनी सांगितले.

दक्षिण गुआंग्डोंग प्रांताची राजधानी ग्वांगझू येथे स्थित ईहांग मध्य पूर्व बाजारपेठेत आपले प्रस्थ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या सत्ताधारी कुटुंबाशी संबंधित कंपनीशी हा करार होणार आहे.

या सहकार्याअंतर्गत, चीनची कंपनी ईहांग ईएच २१६ सीरिजची १०० वाहने देणार आहे. ही उडणारी टॅक्सी प्रवासी वाहतूक, हवाई रसद आणि उंच इमारतींमध्ये आग विझवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. चीनच्या या हवाई टॅक्सीची किंमत सुमारे ३,३०,००० अमेरिकन डॉलर्स आहे.

Ahmednagarlive24 Office