Cidco Lottery 2024:- आयुष्यामध्ये जेव्हा व्यक्ती जन्माला येतो तेव्हा त्याचे अनेक प्रकारचे स्वप्न असतात व या स्वप्नांमध्ये जर प्रमुख स्वप्न पाहिले तर आपल्या स्वतःचे हक्काचे घर आणि त्या घरासमोर चारचाकी हे साधारणपणे प्रत्येकाचे स्वप्न आपल्याला दिसून येते व तरुणाई मध्ये या प्रकारचे स्वप्न मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतात.
यातील घराचे स्वप्न पूर्ण करायचे झाले म्हणजे याकरता मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. कारण सध्या घर आणि जागा यांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करता येणे जवळपास अशक्य होते. त्यातल्या त्यात मुंबई आणि पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये तर जवळपास ही अशक्यप्राय बाब असते.
पण सिडको आणि म्हाडा सारख्या गृहनिर्माण संस्था या सोडतीच्या माध्यमातून नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर योगदान पार पडतात.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण सिडकोच्या दृष्टिकोनातून बघितले तर जर कुणाला नवी मुंबईमध्ये घर घ्यायचे असेल तर सिडको कडून सोडत जाहीर करण्यात आली आहे व 902 घरांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. सिडकोच्या संकेतस्थळावर या 902 घरांसाठी नोंदणी करता येणार आहे.
सिडको कडून 902 घरांसाठी सोडत जाहीर
नवी मुंबईत जर घर घ्यायचे असेल तर सिडकोच्या माध्यमातून एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे व सिडकोच्या माध्यमातून 902 घरांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणारी घरे ही खारघर तसेच घनसोली आणि कळंबोली या गृहप्रकल्पांमधील आहेत.
जर याकरिता नोंदणी करायची असेल तर सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर करता येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणारी ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच खुला प्रवर्ग व मध्यम उत्पन्न गटांसाठी असणार आहेत.
कुठे किती आहेत घरे?
सिडकोच्या माध्यमातून 902 घरांसाठी अर्ज मागविण्यात येणार असून हे घरे बघितली तर कळंबोली, घनसोली आणि खारघर या ठिकाणी 213 घरे आहेत. या 213 घरांपैकी 175 ही सर्वसामान्य प्रवर्गाकरिता तर 38 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आहेत. महत्वाचे म्हणजे खारघर मध्ये सिडकोचे वास्तु विहार सेलिब्रेशन आणि स्वप्नपूर्ती हे दोन प्रकल्प असून त्या ठिकाणी 689 घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
किती आहेत घरांच्या किमती?
सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या घरांच्या किमती बघितल्या तर कळंबोली या ठिकाणी ईडब्ल्यूएस प्रवर्गाकरिता सहा घरे असून त्यांची किंमत 26 लाख 32 हजार 368 रुपये इतकी आहे. खारघर या ठिकाणी देखील ईडब्ल्यूएस करिता 31 घरे असून त्यांची किंमत 26 लाख 49 हजार 718 रुपये इतकी आहे.
घनसोली येथे देखील इडब्ल्यूएस करिता एक घर असून त्याची किंमत 26 लाख 9 हजार 420 रुपये इतकी आहे. तसेच सर्वसाधारण गटाकरिता खारघर येथे 143 एकूण घरे असून यांच्या किमती 37 लाख 95 हजार 173 रुपये आहेत. कळंबोली या ठिकाणी सर्वसाधारण गटासाठी 31 घरे असून त्यांची किंमत सर्वसाधारणपणे 37 लाख 47 हजार 159 रुपये इतकी आहे.
घनसोली येथे सर्वसाधारण गटाकरिता 31 घरे असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 36 लाख 72 हजार पाचशे पाच रुपये इतकी आहे.
त्यासोबतच खारघर सेलिब्रेशन येथे दहा घरे असून ती मध्यम उत्पन्न गटांकरिता असून त्यांची किंमत तब्बल 66 लाख रुपये आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता 23 घरे असून त्यांची किंमत एक कोटी तेरा लाख 93 हजार रुपये इतकी आहे.
सिडकोच्या महत्त्वाच्या प्रकल्पातील घरांच्या किमती
सिडकोच्या व्हॅली शिल्प येथील उच्च उत्पन्न गटाकरीता 136 सदनिका असून त्यातील एका घराची किंमत दोन कोटी पाच लाख पाच हजार रुपये तर मध्यम उत्पन्न गटाकरीता 118 घरे असून त्यातील एका घराची किंमत एक कोटी सात लाख 26 हजार रुपये इतकी आहे.
तसेच सिडकोच्या स्वप्नपूर्ती येथील प्रकल्पातील इडब्ल्यूएस करिता 42 घरे असून एका घराची किंमत 37 लाख रुपये तर सर्वसाधारण गटाकरिता 359 घरे असून त्यांच्या किमती 46 लाख 48 हजार रुपये इतकी आहेत.
केव्हापासून करता येईल अर्ज?
सिडकोच्या माध्यमातून 902 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून याकरिता नोंदणी करायची असेल तर ती सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर करता येणार आहे व अर्ज 27 ऑगस्ट पासून करता येणार आहेत.