मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे ही प्रत्येकाची इच्छा असते व मोठे शहरांमध्ये आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न बरेच जण बाळगत असतात. परंतु सध्या घरांच्या वाढलेल्या प्रचंड किमतीमुळे प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य होत नाही.
परंतु अशा पद्धतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्था खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मदत करत असतात.
आपल्याला माहिती आहे की या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून घरांसाठी सोडत जाहीर केली जाते व यामध्ये भाग्यवान विजेत्यांना घराचा लाभ दिला जातो.या अनुषंगाने जर आपण सिडकोच्या दृष्टिकोनातून बघितले तर सिडकोच्या माध्यमातून देखील मागच्या सात वर्षाच्या कालावधीमध्ये विविध घटकांकरिता 25000 पेक्षा जास्त घरे उभारण्यात आलेली आहेत
व येणाऱ्या चार वर्षात चार टप्प्यांच्या स्वरूपामध्ये परत 67 हजार घर बांधायचे सिडकोची नियोजन आहे व यातील 41 हजार घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यातील 25000 घरे सिडको आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्या अगोदर विक्रीस आणणार आहे. यासंबंधीचीच माहिती या लेखात बघू.
सिडको करणार निवडा तुमच्या आवडीचे घर संकल्पने अंतर्गत घरांची विक्री
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 25000 घरे सिडको विक्रीकरिता उपलब्ध करण्याची शक्यता असून या घरांची विक्री निवडा तुमच्या आवडीचे घर या संकल्पने अंतर्गत केली जाणार आहे
व प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्त्वावर घरे उपलब्ध करण्याची सिडकोची योजना असल्याची माहिती समोर आली आहे.निवडा तुमच्या आवडीचे घर या संकल्पनेची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे व या अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे घर निवडता येणार आहे.
या सगळ्या घरांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार असून यामध्ये घरांचे क्षेत्रफळ तसेच किंमत व नकाशा इत्यादी बद्दलची संपूर्ण माहिती असणार आहे.घर निवडल्यानंतर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर डिपॉझिट भरून घर रिझर्व म्हणजे आरक्षित करता येणार आहे.
कुठे उभारली जात आहेत सिडकोची घरे?
सिडको सध्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न जे काही घटक आहेत त्यांच्याकरिता विविध भागांमध्ये घरे बांधत असून त्यामध्ये वाशी, जुईनगर तसेच तळोजा, खारघर, मानसरोवर, कामोठे, कळंबोली करंजाडे इत्यादी नोडमध्ये ही बांधकामे सुरू आहेत.
एकूण घरांपैकी सगळ्यात जास्त घरे ही तळोजा नोडमध्ये बांधण्यात येत आहेत. परंतु त्या तुलनेत आपण जुईनगर तसेच वाशी, मानसरोवर इत्यादी ठिकाणाची घरे बघितले तर ती जास्त मोक्याच्या ठिकाणी आहेत.
सिडकोच्या घरांचा इतिहास पाहिला तर 2018 मध्ये सिडकोने साधारणपणे 18000 घरांची योजना जाहीर केली होती व ही योजना सिडकोची आतापर्यंतची सर्वात मोठी गृह योजना म्हणून ओळखली जात होती.
परंतु आता सिडकोच्या इतिहासातील ही 25000 घरांची बंपर योजना प्रथमच जाहीर केली जाणार असून ती आता सर्वात मोठी गृहयोजना ठरणार आहे.