Cotton Market Price : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात कापसाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात सर्व दूर कापसाची शेती केली जाते.
या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू असून यामुळे कापूस वेचणी रखडली आहे. यामुळे कापूस पिकाचे नुकसान होत आहे.
कापसात मोठ्या प्रमाणात आद्रता अर्थातच ओलावा असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी बंद केली आहे. तसेच ज्या ठिकाणी कापसाचे खरेदी सुरू आहे तिथेही कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
एवढेच नाही तर कापसाच्या उभ्या पिकात सध्या वेगवेगळ्या रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. रसशोषक किडी तसेच बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक पूर्णतः हदबल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या कापसाला सहा ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय.
सध्या बाजारात जो कापूस दाखल होत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आद्रता आणि ओलावा असल्याचे दिसते. याचमुळे सध्या बाजारात कापसाला फारसा भाव मिळत नाहीये. खानदेशातील अनेक भागांमध्ये कापसाची आवक सुरू झाली आहे.
विजयादशमी नंतर कापसाची आवक वाढत असते. मात्र अजूनही राज्यात कापसाची फारशी आवक होत नसल्याचे चित्र आहे. तथापि ज्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात पैशांची गरज आहे ते शेतकरी बांधव कमी भावातही कापूस विक्री करत आहेत.
मध्यंतरी कापसाचे भाव वाढले होते. राज्यातील काही बाजारांमध्ये सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत होता. मात्र तदनंतर कापसाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झालेत.
सध्या बाजारात 6000 ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल या दरात कापसाची विक्री होत आहे. अशातच बाजारातील अभ्यासकांनी आगामी काळात कापसाचे भाव वाढतील असे जाहीर केले आहे. आणखी एक आठवड्यानंतर अर्थातच 22 ते 23 ऑक्टोबर नंतर कापूस बाजार भावात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटी कापसाला समाधानकारक भाव मिळू शकतो असा अंदाज काही जाणकारांनी वर्तवला आहे. एकंदरीत सध्या कापसाचे दर दबावात असून आणखी एका आठवड्यात कापसाचे दर सुधारू शकतात असे म्हटले जात आहे.