Cotton News : कापूस हे राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक शेती होते तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अलीकडे या पिकाखालील क्षेत्र वाढू लागले आहे. विशेष बाब म्हणजे केले हंगामात कापसाला 14 हजारापर्यंतचा दर मिळाला असल्याने मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी कापसाला यंदा प्राधान्य दिल्याचे चित्र होते. मात्र या हंगामात गेल्या हंगामाप्रमाणे विक्रमी दर मिळत नसल्याचे
वास्तव समोर असून कापूस लागवडीचा निर्णय शेतकऱ्यांच्या अंगलट आले असल्याचे समजतं आहे. आता जवळपास फेब्रुवारी महिना संपत चालला आहे मात्र तरीही कापसाला विक्रमी दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस अजून किती काळ साठवायचा हा मोठा प्रश्न भेडसावू लागला आहे. विशेष म्हणजे, भाव वाढीच्या आशेने कापूस साठवणूक करताना शेतकऱ्यांना नानाविध संकटांचा सामना करावा लागत आहे.
कापूस अधिक काळ साठवला असल्याने कापसात वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव झाला असून या कीटकांमुळे शेतकरी व शेतकरी कुटुंबीयांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कापसात तयार झालेल्या कीटकांच्या चाव्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर पुरळ सुटत असून खाज सुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दवाखान्यात अंगावर खाज सुटण्याच्या तक्रारी घेऊन शेतकरी आपल्या परिवारांसह मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.
यामुळे सध्या मिळत असलेल्या बाजारभावात कापूस विक्रीही करता येत नाही आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने कापसाचीं साठवणूक देखील करता येत नाही अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. दरम्यान आता कापूस बाजारातील अभ्यासक लोकांनी दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. कापूस उत्पादकांनी घाबरून जाऊ नये आणि पॅनिक सेलिंग टाळावे अस आवाहन करत लवकरच दर वाढ होईल असं जाणकार लोक सांगत आहेत.
जाणकार लोकांच्या मते सद्यस्थितीला कापूस 8000 च्या दरात विक्री होत आहे. मात्र यामध्ये आता वाढ होणार आहे.
गेल्या आठवड्यात दबावात असलेले दर आता सुधारू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला असता त्या ठिकाणी कापूस दरात तेजी आली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बांगलादेश कडून आपला भारतीय कापसाची मागणी वाढली आहे. यामुळे सध्या स्थितीला बांगलादेशमध्ये होणारी निर्यातीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे चीनकडूनही भारताचा कापूस खरेदीसाठी तयारी दाखवण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर चीनमध्ये हालचाली वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणून या आठवड्यात पाचशे रुपयांचे तेजी कापूस दरात पाहायला मिळाले. गेल्या आठवड्यात 8000 चा कापसाला भाव मिळत होता मात्र या आठवड्यात 8500 असा दर मिळत आहे. तसेच जाणकार लोकांनी कापसाला 8500 ते 9500 दरम्यान या हंगामात भाव मिळणार असल्याचा अंदाज बांधला आहे. यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आगामी काही दिवसात दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.