स्पेशल

कापूस उत्पादकांसाठी खुशखबर ! कापूस विक्रीनंतर आता शेतकऱ्यांना 24 तासात चुकारे मिळणार

Published by
Ajay Patil

Cotton News : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या अनैतिक धोरणामुळे देखील मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, चक्रीवादळ यांसारख्या नानाविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेतकरी बांधव शेतमाल उत्पादित करतात.

मात्र अनेकदा शेतमाल विक्री करतानाही शेतकऱ्यांना अडचणीना सामोरे जावे लागते. एक तर आधीच बाजारात शेतमालाला अपेक्षित दर मिळत नाही त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून शेतमाल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेचच चुकारे या ठिकाणी दिले जात नाहीत. यामुळे शेतकरी बांधव आर्थिक कोंडीत सापडतो.

खरं पाहता शासनाकडून शेतमाल विक्री केल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना चुकारे दिली पाहिजे असे आदेश जारी झाले आहेत. मात्र असे असतानाही शेतकऱ्यांना कॅश उपलब्ध नाही असे म्हणून सहा ते सात दिवसांचे धनादेश दिले जातात. त्यामुळे शासनाच्या त्वरित चुकारे देण्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे. अशातच मात्र कापूस उत्पादकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे.

देवळी बाजार समिती अंतर्गत कापूस विक्री करणाऱ्या कापूस उत्पादकांसाठीही दिलासादायक बातमी आहे. यां बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या खाजगी जिनिंग प्रेसिंगमध्ये कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तत्काळ चूकारे दिले जाणार आहेत. कापूस विक्री केल्यानंतर 24 तासांच्या आत संबंधित शेतकऱ्यांना आता चुकारे मिळणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देवळी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खाजगी जिनिंग प्रेसिंगच्या माध्यमातून कापसाची खरेदी ही होत असते.

मात्र या बाजार समिती अंतर्गत होणाऱ्या कापूस खरेदीमध्ये शेतकऱ्यांना चुकारे वेळेवर मिळत नव्हते. शासन आदेशानुसार कापूस विक्रीनंतर 24 तासांच्या आत संबंधित शेतकऱ्यांना चुकारे मिळणे अपेक्षित होते मात्र तरीही व्यापाऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या कापसाला चुकारे देण्यात पाच ते सहा दिवसांचा वेळ घेतला जात होता.

अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली. या अनुषंगाने गेल्या आठवड्यात बाजार समिती प्रशासनाकडून कापूस खरेदीनंतर 24 तासांच्या आत संबंधित शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निश्चितच या निर्णयामुळे देवळी बाजार समिती अंतर्गत कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Ajay Patil