स्पेशल

नादखुळा ! एका गुंठ्यात सुरु केला खेकडा पालन व्यवसाय ; आता महिन्याला कमवताय 60 हजार, वाचा ही अफलातून यशोगाथा

Published by
Ajay Patil

Crab Farming : अलीकडे नवयुवक शेतकरी शेती सोबतच वेगवेगळे शेतीपूरक व्यवसायात आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे या शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. दरम्यान शेतीपूरक व्यवसायातही नवयुवक तरुणांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत. यामध्ये खेकडा पालनाचा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांना आकर्षित करत असल्याचे चित्र आहे.

पुणे जिल्ह्यातील दोन भावांनी देखील खेकडा पालनाच्या या शेतीशी निगडित व्यवसायातून चांगली कमाई करण्याची किमया साधली आहे. जिल्ह्यातील ओतूर-मेंगाळवाडी येथील शांताराम व सतीश वारे या दोन बंधूंनी खेकडा पालन व्यवसायात आपलं नशीब आजमावलं असून सद्यस्थितीला ते या व्यवसायातून महिन्याकाठी साठ हजाराची कमाई करत आहेत. यामुळे सध्या या शेतकरी बंधूंची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.

शांताराम व सतीश वारे यांच्याकडे केवळ दीड एकर शेत जमीन आहे. अशा परिस्थितीत ते शेतीशी निगडित इतर व्यवसायात अधिक रस दाखवत आहेत. याचं अनुषंगाने त्यांनी खेकडा पालन हा व्यवसाय सुरू केला होता. आजच्या घडीला खेकडा पालन व्यवसाय सुरु करून त्यांनी आयुष्यात आर्थिक स्थैर्यता आणली आहे. खेकडा पालन व्यवसाय सुरू करताना त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून यासाठी आवश्यक माहिती जमवली. याशिवाय त्यांनी जवळच्या बाजारपेठेत जाऊन खेकडा बाजाराचा अभ्यास देखील केला.

इंटरनेट मधून जी काही थोडीफार माहिती त्यांना मिळाली यातूनच त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी 20×15 लांबी रुंदीची टाकी बनवली. त्याच्याच बाजूला एक छोटी टाकी पंधरा बाय सहा फूट लांबी रुंदीची बनवली. या छोट्या टाकीत त्यांनी संपूर्ण पाणी भरून ठेवले आणि मोठ्या टाकीत अर्धा फूट पाणी भरून त्यामध्ये खेकडा पालन सुरू केलं. जी मोठी टाकी होती त्यामध्ये वाळू आणि माती देखील टाकण्यात आली जेणेकरून खेकड्यांना सुटेबल असं एन्व्हायरमेंट तयार होईल.

एवढेच नाही तर खेकडे आडोशाला जाऊन बसतात त्यामुळे त्यांनी या टाकीत फुलदाणी ला वापरल्या जातात त्या कुंड्या तसेच पाण्यात वाढणारे काही गवताचे गठ्ठे देखील टाकलेत. सुरुवातीला त्यांनी खेकड्यांचे बीज पिंपळगाव जोगा धरणातून एका स्थानिकांकडून आणले. साधारण एका वर्षानंतर खेकडा पालन व्यवसायातून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. चार ते पाच खेकड्यांचे वजन हे एक किलोग्रॅम पर्यंत भरते. ज्या ठिकाणी खेकडा पालन केले जात आहे त्या टाकीचे पाणी पंधरा दिवसातून एकदा बदलणे अपेक्षित आहे.

दरम्यान त्यांनी खेकडा विक्री करण्यासाठी व्हाट्सअप चा प्रभावी वापर केला. व्हाट्सअप च्या माध्यमातून त्यांनी खेकडा विक्री सुरू केली. तीनशे रुपये प्रति किलो याप्रमाणे ते जागेवरच खेकडा विक्री करत आहेत. सुरुवातीला दहा किलो पर्यंत विक्री होत होती आता तर तीस ते पस्तीस किलो पर्यंतची विक्री ते करत आहेत. विशेष म्हणजे खेकड्याची विक्री जागेवरच होत असल्याने बाजारपेठ शोधण्यासाठी त्यांना वनवन भटकण्याची गरज राहिलेली नाही.

खेकडा विक्री करण्यासोबतच ते खेकड्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करूनही विक्री करत आहेत. यासाठी त्यांनी एक छोटीशी हॉटेल सुरू केली आहे. हॉटेल सह्याद्री रानमेवा अस या हॉटेलचे नाव त्यांनी ठेवलं असून यातून त्यांना चांगले उत्पन्न आता मिळू लागले आहे. निश्चितच वारे बंधूंनी खेकडा पालन व्यवसायात केलेली ही कामगिरी इतरांसाठी प्रेरक राहणार असून यामुळे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil