नगर दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीत, सुजय विखेंचा पराभव झाला. स्वतः विखेंनाच काय, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटतं नव्हतं असंच घडलं. दोन-पाच हजार मतं इतकं-तिकडं, असे अंदाज बांधले जात असताना, दादा तब्बल 30 हजारांनी पराभूत झाले. विकासकामांचा डोंगर, प्रश्नांची जाण, आक्रमक स्वभाव, कार्यकर्त्यांची फौज, तगडी यंत्रणा, असं सगळं असतानाही हा पराभव झाला. त्यामुळे हा पराभव कुणाच्याही जिव्हारी लागणारा असाच होता. त्यानंतर दादांनी आपली स्टाईल बदलली. स्वतःच्या यंत्रणेत बदल केले, कावळ्याच्या आधी दहाव्याला मी हजर राहील, असंही सांगितलं. पण हे सगळे बदल स्विकारले गेलेत का, हा प्रश्न आहे.
दादांनी नुकतीच थेट मुंबई-पुण्यात जाऊन एका मिडिया हाऊसला मुलाखत दिली. त्या मुलाखतीतही आपल्यातले बदल व पराभवाची कारणे त्यांनी सांगितली. आता तुम्ही म्हणाल, राजकारण नगरला करायचं, मग मुलाखत द्यायला पुण्या-मुंबईला का गेले, नगरमध्ये पत्रकार नव्हते का… तर तो त्यांचा प्रश्न… हा, तर दादांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीत पराभवाची कारणे आणि आगामी विधानसभेची रणनिती त्यांनी थोडक्यात मांडली. शिवाय पक्षाने संधी दिल्यास संगमनेरमधून विधानसभा लढण्याची तयारी दुसऱ्यांदा बोलून दाखवली. मित्रांनो, हेच बदललेलं राजकारण आणि बदललेले दादा, या विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
नुकत्याच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दादांनी पराभव नेमका कशामुळं झाला, हे सांगितलं. सोशल मिडिया, फेक नॅरेटिव्ह, चुकीचे मॅसेजेस, यामुळे आपला पराभव झाल्याचं दादांनी स्पष्ट केलं. दादांनी पाच वर्षांत खरोखर कोट्यवधींचा निधी आणला. जी विकासकामे नगरकरांना स्वप्नवत वाटत होती ती कामे केली. पण तरीही लोकांनी सुजय विखेंचा पराभव केला. लोकांना विकास लागतोच. शंभर टक्के लागतो. पण ज्याला आपण मत दिलं, तो उमेदवार आपल्या हक्काचा आहे, हा हक्कही मतदारांना गाजवायचा असतो. दादा फोन उचलत नाही, सुख-दुःखात वेळ देत नाहीत, असे आरोप त्यावेळी प्रचारात झाले. ते शंभर टक्के खरे असतीलही.
कारण ज्याला आपण हक्काने मत दिलं, तो आपल्या हक्काचा नेता आहे, अशी लोकांची भाबडी आशा असते. या मुलाखतीत दादांनी त्यांनी केलेला विकास सांगितला. पण दादा सामान्यांत मिसळत नाहीत, या मुद्यांवर विरोधकांनी जे रान उठवलं होतं, त्या मुद्द्यांना दादांनी हातच खातला नाही. आता हेच पहा ना, नगरमध्ये एवढे दिग्गज पत्रकार, दिग्गज मिडिया हाऊस असताना दादा मुलाखतीला थेट पुण्या-मुंबईला गेले. ठीक आहे, त्यांनी वेळ मागितली असावी, तुम्ही वेळ दिली असावी… पण ज्या कार्यक्षेत्रात आपल्याला राजकारण करायचं, तेथेही त्या तोडीचे पत्रकार मिळतात, हे शोधायला दादा विसरले…
या मुलाखतीत दादांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. पक्षाला गरज असेल, तर दादा आता विधानसभाही लढविण्याची तयारी करताहेत. ती तयारीही, साध्यासुध्या मतदारसंघाची नाही. तर ज्या मतदारसंघात विरोधकांचं थेट डिपाँझिट जप्त होतं त्या संगमनेर विधानसभेत दादांना लढायचंय… लढा दादा, नक्की लढा. कारण बाळासाहेब थोरातांना, फक्त तुम्हीच तोडीस- तोड फाईट देऊ शकता. मात्र ही फाईट देण्यापूर्वी तुम्ही ‘ग्लोबलचे लोकल’ मात्र नक्की व्हा. दादा, लोकांना विकासकामांच्या अपेक्षा असतातच. दक्षिणेचा विकास तुम्ही नक्कीच करुन दाखवलाय. पण विकासकामांबरोबर लोकांना आपलेपणही लागतं, हेही तितकच खरं.
दादांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डीत जोरदार भाषण केलं. शिर्डी ही साईबाबांच्या सर्वधर्मसमभावासाठी ओळखली जाते. विखे कुटुंबानेही तेथे आत्तापर्यंत सर्वधर्मसमभावाचंच राजकारण केलंय. हिंदूत्ववादी समजल्या जाणाऱ्या पक्षात असूनही विखे कुटुंबाने प्रत्येकाला आपलं मानलंय. सर्व जातीधर्माच्या आलुतेदार-बलुतेदारांनी विखे साहेबांना आत्तापर्यंत साथ दिली. यापुढेही देतील. त्यामुळे शिर्डीतलं दादांचं भाषण अगदी परफेक्ट काळजाला लागलं. पण जर दादांना स्वतः संगमनेरमध्ये लढायचं असेल, तर दादांना हीच सर्वधर्मसमभावाची भूमिका कायम ठेवतील का, हा प्रश्न आहे.
कारण संगमनेरमध्ये यापूर्वी लव्ह जिहाद किंवा जातीयवादाच्या अनेक प्रकरणांवरुन रणकंदन झालंय. त्यामुळे दादांना तेथून लढायचे असेल, तर दादांनी ही भूमिका तेथे कितपत स्विकारली जाईल, हे पहावे लागेल. विखे साहेबांनी शिर्डीत व थोरात साहेबांनी संगमनेरमध्ये आत्तापर्यंत सर्वसमावेशक राजकारण केलं. त्यामुळे दरवेळी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या विजयात विक्रमी मतांची वाढ केली. पण यंदा दादांना संगमनेरमधून आपली ताकद आजमवायची असली तर, मात्र त्यांना हिंदूत्वाचा अजेंडाची मदत घ्यावा लागण्याची शक्यता आहे. कारण संगमनेरमध्ये स्थानिक भाजप व शिवसेनेने आत्तापर्यंत हिंदूत्वाच्या अजेंड्याला प्रथम क्रमांकावर ठेऊनच राजकारण केलंय. त्यामुळे दादांनाही आपली भूमिका बदलावी लागण्याच्या शक्यता आहेत.