स्पेशल

Dhanteras Marathi Information : जाणून घ्या धनत्रयोदशीबद्दल मराठी माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी! आपण या दिवशी नवीन सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करत असतो. धनत्रयोदशीला आपण धनाच्या देवतेची पुजा देखील करतो.

आपण धनत्रयोदशी का साजरी करतो? त्याचे महत्व काय आहे? धनत्रयोदशी ची पुजा कशी करतात? धनत्रयोदशी विषयी पौराणिक कथा आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

धनत्रयोदशी म्हणजे नक्की काय? What is Dhanteras in Marathi

धनत्रयोदशी हा दिवस म्हणजे हिंदू संस्कृतीतील सर्वात पवित्र असणाऱ्या दिवाळी सणाचा दुसरा दिवस होय. नावात या दिवसाचे बरेचसे महत्व सांगितलेले आहे. धनत्रयोदशी या शब्दाची जर आपण फोड केली, तर यात धन म्हणजे पैसा आणि त्रयोदशी म्हणजेच तेरस होय.

मराठी कालनिर्णयात असलेला कार्तिक महिन्याचा तेरावा दिवस म्हणजे एकादशी नंतर दोन दिवसांनी येणारी त्रयोदशी. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात त्रयोदशीला हा उत्सव असतो. काही लोक धनत्रयोदशीला दिवाळीचा पहिला दिवस मानतात मात्र दिवाळीचा पहिला दिवस हा महाराष्ट्रात वसुबारस हाच साजरा केला जातो.

धनत्रयोदशीच्या दिवशी यमाची आणि धनाची देवता धन्वंतरीची पुजा करायला महत्व आहे. दिवसाची सुरुवात ही पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करून होते. यामध्ये प्रत्येक जण एकेमकाना धनत्रयोदशी च्या शुभेच्छा देऊन दिवसाचे महत्व वाढवतो. घरासमोर रांगोळी काढली जाते आणि विद्युत रोषणाई देखील केली जाते.

2021 धनत्रयोदशी || Dhanteras 2021

2021 साली 2 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. यादिवशी आपण भांडी आणि सोने चांदी खरेदी करत असतो. पूजेचा या वर्षी मुहूर्त हा संध्याकाळी 6:28 ते 8:04 इतका आहे. या 1 तास 36 मिनिटांच्या कालावधीत तुम्हाला ही पूजा पार पाडायची आहे.

धनत्रयोदशी का साजरी केली जाते? Why to celebrate Dhanteras in Marathi?

आपल्याकडे पौराणिक कथांमध्ये या कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी हे हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले असा उल्लेख आहे.

यामध्ये हे अमृत आरोग्याला सुधारणा करण्यासाठी होते असे सांगितले जाते. भगवान विष्णूनी हे घेतलेले एक रूप होते. याच समुद्र मंथनाचा संबंध हा दिवाळी शी देखील जोडला गेलेला आहे. लक्ष्मी पूजन या दिवाळीच्या महत्वाच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशी नंतर 2 दिवसांनी लक्ष्मी देवीचा याच समुद्र मंथनाचा जन्म झाला होता असे पौराणिक कथा सांगतात.

आपल्या भारतीय संस्कृतीत आधी आरोग्य आणि नंतर धन ही संकल्पना तेव्हाच रुजू झाली असावी. धनत्रयोदशी आपण धन्वंतरी देवाची पुजा करण्यासाठी त्यांच्या प्रकटदिनी साजरा करत असतो. भगवान धन्वंतरी यांना देवांचे वैद्य म्हणून ओळखले जाते. त्यांचा हा अवतार मनुष्यातलावर वैद्यकशास्त्राचा प्रसार करण्यासाठी झाला होता असे म्हटले जाते.

धनत्रयोदशीला कोणत्या देवांची पूजा केली जाते?

file photo

दिवाळी निमित्त सर्व घरे ही स्वच्छ आणि साफ केली जातात. घरांमध्ये दिवाळी निमित्त आनंदी वातावरण असते. धनत्रयोदशी ला रात्रीच्या वेळी घरात पूजा मांडून गणपती बाप्पा, लक्ष्मी देवी, कुबेर आणि धन्वंतरी भगवान यांची पूजा केली जाते. याशिवाय नवीन भांडी, सोने चांदी यांची देखील पूजा करून यमराजाची वाईट दृष्टी घरापासून दूर ठेवली जाते.

धनत्रयोदशी ची पूजा कशी करावी? How to Worship on Dhanteras?

लाल रंगाचा कापडावर भगवान गणेश यांना बसवून त्यांचे नामस्मरण करून त्यांना फुले अर्पण केली जातात. श्री गणेशाची पूजा केल्यानंतर भगवान धन्वंतरी या आरोग्य देवतेची पूजा केली जाते.

धन्वंतरी यांना पूजेला मांडण्याआधी त्यांना अभिषेक घातला जातो. पूजेला त्यांची मूर्ती किंवा फोटो मांडल्यानंतर त्यांना नऊ वेगवेगळ्या प्रकारचे धान्य अर्पण केले जाते.

त्यानंतर धनाची देवता कुबेर यांना बसवून त्यांना मिठाई, फुले आणि धन अर्पण केले जाते. त्यांच्याकडे घरात धनाची कमतरता नसावी म्हणून प्रार्थना केली जाते. त्यानंतर देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवून देवीकडे घरावर संकट येऊ नये, घरात लक्ष्मीचा वावर असावा म्हणून प्रार्थना केली जाते.

धनत्रयोदशी चे महत्व || Importance of Dhanteras

file photo

धनत्रयोदशीच्या दिवशी आपण चांदी आणि सोने खरेदी करत असतो. कारण या दिवशी दागिने किंवा नवीन वस्तू घेणे शुभ मानले जाते. आपण या वस्तू घरी आणल्या की असे समजले जाते की आपण देवी लक्ष्मीला घरी आणले.

धन्वंतरी यांचा जन्म होताना त्यांच्या हातात कलश होता त्यामुळे या दिवशी भांडी घेण्याची आणि त्यांची पूजा करण्याची देखील प्रथा आहे.आपण लक्ष्मी देवीची देखील या दिवशी पूजा करत असतो.घराच्या अवतीभवती विद्युत रोषणाई करून दिवे लावून रात्री परिसर उजळवून आनंदी आनंद साजरा करण्याची प्रथा आहे.

धनत्रयोदशी विषयी कथा || Stories behind Celebrating Dhanteras

धनत्रयोदशी विषयी अनेक पौराणिक कथा आहेत त्यातील काही कथा आज आपण जाणून घेऊयात. यांना पौराणिक संबंध आपल्या ग्रंथांमध्ये आहे.

राजा हिमाचा तरुण मुलगा

एकेकाळी राजा हिमा आपले राज्य सांभाळत होता. त्याला एक मुलगा देखील होता. त्याच्या मुलाच्या मृत्यूविषयी एक भविष्यवाणी केली गेलेली होती. जेव्हा त्याचे लग्न होईल त्यानंतर 14 व्या दिवशी सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होईल अशी ती भविष्यवाणी होती. तरी देखील त्या मुलाचे लग्न झाले.

लग्नानंतर 14 व्या दिवशी त्याच्या पत्नीने तिचे सर्व दागिने, भांडे काढुन दरवाजाच्या बाहेर ठेवले. त्यातून प्रकाश निर्माण झाला आणि सगळीकडे परिसर उजळून निघाला. खोलीत सर्वत्र प्रकाश होता आणि तिला तिच्या पतीला झोपू द्यायचे नव्हते. त्यामुळे तिने तिच्या पतीला गोष्टी सांगायला आणि गाणी म्हणायला सुरुवात केली.

या वेळी यमराज देखील तिच्या पतीला घेण्यासाठी आले मात्र खोलीत असलेला इतका प्रचंड प्रकाश त्यांना आत जाऊ देत नव्हता. यमराज देखील दरवाजाच्या बाहेर थांबून त्याच्या पत्नीने सांगितलेल्या गोष्टी आणि गाणी ऐकू लागले.

रात्र निघून गेली. 14 वा दिवस देखील संपला. यमराज पहाट होताच रिकाम्या हाताने तिथून निघून गेले. राजा हिमाच्या तरुण मुलाचे प्राण त्याच्या पत्नीने वाचविले होते.त्या दिवसापासून आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करतो आणि या दिवशी यमाची देखील धन ठेवून पूजा केली जाते. भांडी आणि सोने चांदीच्या वस्तू खरेदी करून आपण वाईट गोष्टींना घरापासून दूर ठेवत असतो.

असुरांचे गुरू शुक्राचार्य :

राजा बळीच्या भीतीने देव भयभीत झाले होते. देवांना वाचविण्यासाठी विष्णूने वामनाचे रूप घेऊन बळीराजाच्या यज्ञ होत असलेल्या ठिकाणी प्रवेश केला. त्यावेळी शुक्राचार्य तिथे होते. त्यांनी भगवान विष्णूंना दुसऱ्या रुपात देखील ओळखले. बळीराजाला त्यांनी वामनाने मागितलेले सर्व काही नाकारण्यास सांगितले.

बळी राजाने शुक्राचार्यांचे ऐकले नाही आणि वामनाने मागितलेली 3 पाऊल जमीन दान करण्याचे ठरविले. ही प्रतिज्ञा घेत असताना बळी राजाने कमंडलू मध्ये पाणी सोडण्यास हात टाकला मात्र शुक्राचार्यांनी लहान रूप धारण करून कमंडलू मध्ये प्रवेश केला होता. पाणी बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला होता.

वामनाला हे समजले आणि त्याने कमंडलू मध्ये हात घालताना कुश असा ठेवला की त्यामुळे शुक्राचार्यांचा डोळा फुटला आणि घाईघाईत ते कमंडलूच्या बाहेर पडले.

धनत्रयोदशी निमित्त पौराणिक आख्यायिका ही आहे की अमृत मंथनात अडथळा आणणाऱ्या असुरांमुळे असुरांचे गुरू शुक्राचार्य यांचा डोळा भगवान विष्णू यांनी फोडला होता. वामनाने एक पाऊल अंतराळात, दुसरे पाऊल पृथ्वीवर टाकले. आता तिसरे पाऊल टाकायला मात्र जागा नव्हती.

बळीराजाने वामनाच्या चरणी त्याचे डोके ठेवले. वामनाने ते तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले. बळीराजाने या यज्ञात सर्व काही गमावले होते!

अमृत मंथनातून अमृत बाहेर पडले

आपण या दिवशी पहिले चांगल्या आरोग्यासाठी पूजा करत असतो कारण या दिवशी क्षीरसागरातून मंथन करत असताना अमृत बाहेर पडले होते. हे अमृत देवांसाठी त्यावेळी वैद्यकीय ठरले होते. भगवान धन्वंतरी या समुद्र मंथनातून हातात अमृताचा कलश घेऊन त्रयोदशीच्या दिवशी बाहेर पडले होते.

त्यामुळे या दिवशी आपण आरोग्य आणिधन्वंतरी भगवंताची लक्ष्मी देवीसोबत पूजा करतो. धनत्रयोदशी हा सण आपण का साजरा करतो, कशासाठी करतो, पौराणिक कथांचा कसा संदर्भ आहे आणि ही पूजा कशी केली जाते याविषयी आज आपण माहिती बघितली. आज धनत्रयोदशी निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office