भाजीपाला पिके म्हटले म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये लाखोत उत्पन्न देण्याची क्षमता या पिकांमध्ये असते. फक्त उत्पादन चालू झाल्यानंतर जोपर्यंत उत्पादन चालू आहे त्या कालावधीत जर बाजारभाव चांगला मिळाला तर तीन ते चार महिन्याच्या कालावधीत लाखोत उत्पन्न शेतकरी या माध्यमातून मिळवू शकतात.
इतर पिकांपेक्षा खर्च भाजीपाला पिकांना कमी असतो आणि दररोज हातात पैसा खेळता राहण्याच्या दृष्टिकोनातून भाजीपाला पिकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्याकडे प्रामुख्याने भाजीपाल्यामध्ये वांगे, मिरची तसेच भेंडी व पालेभाज्यांमध्ये मेथी तसेच कोथिंबीर, पालक व टोमॅटो आणि वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये गिलके, कारले तसेच दोडक्याचे उत्पादन घेतले जाते.
अगदी याच पद्धतीने जर आपण दौंड तालुक्यातील खुटबाव या गावचे विक्रम शेळके या तरुण शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर त्यांनी कुटुंबाच्या सहकार्याने एक एकर क्षेत्रावर दोडका पिकाची लागवड करून उत्पादन घेतले व लाखोत उत्पन्न मिळवण्यामध्ये यश मिळवले. त्याचीच यशोगाथा आपण या लेखात बघू.
दोडक्यातून मिळवले तीन लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दौंड तालुक्यातील खुटबाव या गावचे विक्रम रावसाहेब शेळके या तरुण शेतकऱ्यानी कुटुंबाचे सहकार्य घेत एक एकर क्षेत्रावर दोडका पिकाची लागवड करण्याचे ठरवले. घरच्या एक एकर शेतीत त्यांनी दोडका पीक लावल्यानंतर 45 दिवसांमध्ये या पिकापासून उत्पादन मिळवणे त्यांना चालू झाले व एकदा उत्पन्न चालू झाले की पुढचे 45 दिवस हे उत्पादन मिळत राहते.
विक्रम यांनी दोडका पिकासाठी योग्य असे व्यवस्थापन ठेवले. तसेच पिकाला लागणारी खते व कीटकनाशके फवारणी, पिकासाठी आवश्यक बांधणी आणि पीक आल्यानंतर त्याच्या तोडणीपासून तर मार्केटमध्ये जाऊन विक्री व्यवस्थापन याचे योग्य नियोजन केले व अशा पद्धतीने कष्ट घेऊन त्यांना आज या पिकाने लखपती बनवलेले आहे.
अशा पद्धतीने केले पिकाचे नियोजन
जेव्हा त्यांनी दोडका पीक लागवडीचा निर्णय घेतला तेव्हा पूर्व तयारी करण्यासाठी त्यांनी लागवडीच्या अगोदर शेतामध्ये दहा ट्रॉली शेणखत वापरले. त्यामुळे पीक चांगले जोमात आले व पिकाची लागवड केल्यानंतर पहिल्या 45 दिवसात यामध्ये काकडी व टोमॅटोच्या आंतरपीक घेतले.
यातून त्यांनी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले व माध्यमातून दोडक्यासाठी आलेला संपूर्ण खर्च त्यांनी काढला. आता 45 दिवसांनी दोडक्याचे उत्पन्न सुरू झाले असून हा पूर्ण त्यांचा नफा असणार आहे.
दररोज त्यांचा 150 किलो दोडके निघत असून एका किलोसाठी 70 ते 90 रुपयांचा दर मिळाला आहे. ते दोडके विक्रीसाठी मांजरी येथील मार्केटमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी विक्री करतात.
कुटुंबाचे सहकार्य ठरले मोलाचे
विक्रम यांच्या या सगळ्या प्रयत्नांना कुटुंबाच्या माध्यमातून देखील मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचा भाऊ महाविद्यालयाने शिक्षण घेत आहे. परंतु सुट्टी असली की तो देखील शेतामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतो.
विक्रम यांच्या आई आणि पत्नी यांनी देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत केली व शेतीमध्ये कष्ट घेतले. विशेष म्हणजे यामध्ये स्वतः विक्री करत असल्यामुळे अधिकचा नफा ते घेत असून दोडक्यामध्ये आंतर पिकांपासून देखील त्यांचा खर्च निघण्यास मदत झाली व आता दोडक्यापासून त्यांच्या हाती निव्वळ नफा मिळत आहे.
या सगळ्या कुटुंबाच्या प्रयत्नातून त्यांनी अवघ्या तीन महिन्यांमध्ये साडेतीन लाखांचे उत्पन्न दोडके पिकातून मिळवले आहे.