Papaya Crop Cultivation:- कोणतेही पीक असो जर त्यापासून भरघोस उत्पादन हवे असेल तर त्याचे व्यवस्थापन योग्यपणे करणे खूप गरजेचे असते आणि व्यवस्थापनाला जर आधुनिकतेची जोड दिली व त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंब केला तर नक्कीच उत्पादन दर्जेदार मिळण्यास मदत होते व लाखोत आर्थिक उत्पन्न देखील मिळवता येते.
फळबाग लागवडीच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर यामध्ये देखील व्यवस्थापनाला अतिशय महत्त्व आहे व आता ज्या काही सगळ्या टेक्निक आलेले आहेत त्यांचा वापर जर फळबागेमध्ये केला तर कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखोंचे उत्पन्न कसे मिळवता येते हे आपण शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून पाहतो.
याच मुद्द्याला धरून जर आपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या कासारशिरशी या गावचे शेतकरी आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले सुधीर कानडे यांची यशोगाथा बघितली तर ती इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी अशी आहे.
डॉक्टर कानडे यांनी पाच एकर शेतीत पपईची लागवड करून 40 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. परंतु त्यांच्या या यशामागे पपई पिकासाठी केलेले व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कारणीभूत आहे.
डॉ. कानडे यांना पपई पिकाने केले लखपती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र- कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या कासार शिरसी या गावचे व्यवसायाने डॉक्टर असलेले सुधीर कानडे यांनी मागच्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये साधारणपणे पाच एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली व जुलै महिन्यापासून पपईचे उत्पादन मिळायला त्यांना सुरुवात झालेली आहे.
जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्याच्या कालावधीत त्यांनी जवळपास 175 टन पपईची निर्यात केली असून त्यामध्ये तब्बल 40 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांच्या हाती आले आहे.
डॉ. सुधीर कानडे हे डॉक्टर असून कासार शिरशी या ठिकाणी त्यांचे हॉस्पिटल देखील आहे व हा व्यवसाय सांभाळून त्यांनी शेतीकडे लक्ष देऊन दर्जेदार आणि निर्यातक्षम असे पपईचे उत्पादन घेऊन दाखवले आहे.
अशाप्रकारे केले पपईचे नियोजन
त्यांच्याकडे एकूण 22 एकर शेती असून त्यातील पाच एकर क्षेत्रावर पपईची लागवड करावी असा निश्चय त्यांनी केला. पपई लागवडीसाठी मोहोळ येथून रोपवाटिकेतून पपईची दर्जेदार रोपे आणली. पूर्वतयारी म्हणून शेतात नांगरणी केली व चर मारत एक ते दीड फूट खड्ड्यांमध्ये तीन टप्प्यांमध्ये 1600, 1200 आणि 1600 अशी साधारण साडेचार हजार रोपांची लागवड केली.
पाणी व्यवस्थापनासाठी ड्रीप चा वापर केला व पिकाच्या आवश्यकतेनुसार ड्रीपने पाणी दिले. त्यांना या पाच एकर पपईला रोपांची खरेदी ते रोपांची लागवड, फवारणी व इतर अनेक गोष्टी पकडून जवळपास दहा लाख रुपयांचा खर्च आला. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांनी खूप कमी प्रमाणामध्ये या पपई बागेला रासायनिक खतांचा वापर केला.
त्याऐवजी त्यांनी शेणखताचा सर्वाधिक वापर करण्यावर भर दिला. सध्या त्यांच्या पपई बागेमधून 800 ग्राम ते तीन किलो वजनापर्यंत एकेका पपईचे वजन मिळत आहे व अशाप्रकारे भरघोस उत्पन्न त्यांना मिळत आहे. त्यांनी पिकवलेल्या दर्जेदार आणि निर्यातक्षम पपईला पुणे आणि मुंबई तसेच कोलकत्ता येथील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
कोलकाता येथे माल पोहोचायला कमीत कमी चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे चार दिवसांमध्ये माल विक्रीला तयार होईल अशा मालाची व्यापाऱ्यांकडून तोडणी केली जाते व कोलकत्याला जाणारी पपई कॅरेटमध्ये जाते तर पुणे व मुंबईला जाणारी पपई ही कागदात गुंडाळून वाहनांमध्ये भरून विक्रीला पाठवली जाते.
सध्या पपईला 20 ते 24 रुपये प्रतिकिलो इतका दर मिळत आहे व ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 28 रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता. जुलै महिन्यापासून पपईची काढणी सुरू आहे व सरासरी आठवड्याला सात ते आठ टन पपईचे निर्यात ते करत आहेत.
डॉ. कानडे यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या या पपईला बाजारपेठेत देखील चांगली मागणी वाढत आहे. गेल्या चार महिन्यापासून पपईचे उत्पादन त्यांना मिळत असून आतापर्यंत 175 टन पपईची विक्री त्यांनी केली आहे व त्या माध्यमातून त्यांनी 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.