स्पेशल

डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम

Published by
Sushant Kulkarni

आढळा, म्हाळुंगी व प्रवरा या तीन नद्यांचा संगम जिथे होतो ते गाव म्हणजे संगमनेर. त्याचप्रमाणे कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम असलेलं या संगमनेरच्या जनमानसात लोकप्रिय असलेलं एक लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर साहेब.

‘ नेता नव्हे मित्र ‘ ही टॅग लाईन खऱ्या अर्थाने जगणारं नेतृत्व म्हणजे डॉ. सुधीरजी तांबे साहेब. १९८० च्या दशकात सर्जनची पदवी घेऊन संगमनेर सारख्या लहानशा गावात येऊन एक तरुण वैद्यकीय सेवा सुरू काय करतो , अन स्वतः च्या व्यवसायाबरोबरच महाविद्यालयात असल्यापासून असलेली सामाजिक चळवळीची आवड जपत अनेक समवयस्क तरुणांना समाजसेवेच्या दिशेने घेऊन काय जातो, इथेच पुढील घडामोडीची पायाभरणी होते.

अशा कर्तबगार तरुणाला थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात स्वतःच्या परिवारात सामावून काय घेतात अन ही घटना एकूणच संगमनेर गावाचंच नशीब बदलवून टाकते काय हे एखाद्या कादंबरीला शोभणारं कथानक वाटावं अशी गोष्ट आहे. बघता बघता डॉक्टर साहेबांनी आपल्या व्यक्तिमत्वाने संगमनेरच्या सामाजिक ,शैक्षणिक , सहकार व राजकीय क्षेत्र प्रभावित करून टाकले.

सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज या संस्थेचं चेअरमनपद असो की संग्राम मूकबधिर विद्यालय व डॉ.देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालय चं संस्थापक पद त्यांनी भूषवले. संग्राम करिअर ऍकेडमी ची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी बुद्धिमत्ता विकास प्रकल्प, संगणक प्रशिक्षण , मूलभूत कौशल्य , वैद्यकीय / इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा मार्गदर्शन,इंग्रजी संभाषण कौशल्य असे अनेक उपयोगी व महत्त्वाचे प्रकल्प सुरु केले.
ग्रामोदय ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याचबरोबर अभियांत्रिकी शेती व शिक्षण विकास संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करताना अभियांत्रिकी, पॉलीटेक्निक, फार्मसी, एम.बी.ए. , आय टी आय महाविद्यालय व इंग्लिश मिडिअम स्कूल ई. शिक्षण संस्थांची धुरा ते समर्थपणे सांभाळत आहेत. तसेच सौ.मथुराबाई भाऊसाहेब थोरात सेवाभावी ट्रस्ट संचालित अमृतवाहिनी ग्रामीण रुग्णालय, दंत महाविद्यालय , फार्मसी महाविद्यालय ,आयुर्वेदिक महाविद्यालय,नर्सिंग महाविद्यालय व जयहिंद आदिवासी आश्रमशाळा ई. शैक्षणिक संस्थांचे ते विश्वस्तपद सांभाळत आहेत.

याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी १९९८ साली जय हिंद लोकचळवळ व जय हिंद युवा मंचची स्थापना केली. तसेच २००२ साली जय हिंद सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून एक नवी मुहूर्तमेढ रोवली. २००४ मध्ये अहमदनगर येथे आयोजित बंधुता साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषवले. २००५ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या अखिल भारतीय बाल आनंद महोत्सव चे कार्याध्यक्षपद भूषवले. २००५ मध्ये दंडकारण्य अभियान चे मुख्य प्रवर्तक म्हणून काम केले.याअंतर्गत दरवर्षी कोट्यवधी बीजारोपण व लक्षावधी रोपांची ओसाड माळरानावर लागवड केली.हरितसृष्टीचा व पर्यावरण बचावचा संदेश देणाऱ्या या अभियानाची युनो संघटनेकडून जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली.सन २००७ साली त्यांची महाराष्ट्र राज्य अपंग शाळा , कर्मशाळा पदाधिकारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. २००९ च्या अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्य संमेलन चे स्वागताध्यक्ष पदी त्यांची निवड झाली होती.

याचबरोबर १९८८ साली संग्राम नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून त्यांनी सहकार क्षेत्रात काम सुरू केले. २००१ साली त्यांनी संगमनेर तालुका ऍग्रीकल्चर प्रोड्युसर मार्केटिंग को.ऑप.सोसायटी स्थापन करून शेतकऱ्यांना पिकवण्याबरोबरच विकण्याची कला आत्मसात करण्यास प्रवृत्त केले. त्याचवेळी ते संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत होते.

या सर्व आघाड्यांवर काम करत असताना त्यांनी १९९१ सालीच आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. १९९१- १९९६ त्यांनी संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवले.१९९७ – २००० त्यांनी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले, २०००- २००१ त्यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. २००१- २००५ ते अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. २००५ पासून ते अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी चे सदस्य आहेत.या सर्व कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून २००९ साली , सर्व संगमनेरकरांचे डॉक्टरसाहेब आमदार झाले. त्यावेळी ‘आपले डॉक्टर साहेब आमदार झाले ‘ अशा आशयाचे अनेक फलक संगमनेरच्या विविध भागात नागरिकांनी लावले होते.

पदार्पणातच त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातूनत ते पहिल्या फेरीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. आजतागायत ही घोडदौड अशीच आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार त्यांचा मतदारसंघ देखील ५ जिल्हे व ५४ तालुक्यांत पसरलेला आहे.पण या संपूर्ण मतदारसंघात डॉक्टरसाहेबांनी फक्त स्वतःची यंत्रणाच उभारली असे नाही तर या पाचही जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठया कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखतात. या संपूर्ण कार्यक्षेत्रात ते स्वतः फिरून जातीने लक्ष देतात, अनेकांच्या सुख – दुःखात सामील होतात. लग्न, शोकसभा ,दशक्रिया असो की धार्मिक किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यातील पद्धती व परंपरा यावर देखील डॉक्टर साहेबच काय पण ताईदेखील २-३ तास सहज बोलू शकतील.

अनेक कार्यकर्त्यांचं प्रेम , जनतेचा आशीर्वाद ,याचबरोबर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २००३ साली मिळालेला विकास रत्न पुरस्कार असेल किंवा २०१६ साली मिळालेला कै. डॉ. गुप्ते पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत. तसेच डॉक्टर साहेब व ताईंना २०१९ साली साधना व बाबा आमटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर साहेबांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ‘जय हिंद लोकचळवळ या संघटनेने गेल्या २-३ वर्षांत अनेक उपक्रम पार पाडले आहेत , या चळवळीतील अनेक पोर्टफोलिओ समाजतुल वेगवेगळ्या समस्यांवर व आघाडीवर काम करत आहेत.शिक्षण ,महिला सक्षमीकरण ,कला , क्रीडा , वाचन चळवळ , शेती , सहकार , ग्रामविकास अशा अनेक क्षेत्रांत जागतिक पातळीवर नोंद होईल , असं काम करावं यासाठी डॉक्टरसाहेब नेहमीच आग्रही आहेत. त्यादृष्टीने या लॉकडाऊन मध्ये देखील ऑनलाईन पद्धतीने जागतिक परिषद घेऊन जय हिंद लोकचळवळने आपलं ‘from ward to world ‘ हे व्हिजन साकारण्याच्या दृष्टीने वाटचाल करत मोठा पल्ला गाठला आहे. यामध्ये अनेक देशांत स्थायिक झालेल्या जिल्ह्यातील अनेक नागरिकांना एकत्र करत एक जागतिक टीम तयार केली आहे.

हे सर्व काम चालू असताना , दिवसभरात २-३ जिल्ह्यात फिरून येऊन सुद्धा त्यांचा व्यायामाचा नित्यक्रम चुकत नाही तसेच संपूर्ण दिवसभरात त्यांचं आहार व स्वतः च्या फिटनेसकडे लक्ष असतंच परंतु आपल्याबरोबर असणाऱ्या सहकार्यांना देखील ते फिटनेस ,आहार याविषयी प्रयत्न करण्यासाठी आग्रह करत असतात. त्यांचा कामाचा उरक , वाचनाचा व्यासंग , लोकांशी संवाद व चर्चा करतानाचा उत्साह , एवढा प्रवास थक्क करणारा आहे.

Sushant Kulkarni