Marathi News : भूगर्भीय हालचालींमुळे हिमालयाचा आकार सातत्याने बदलत असून हिमालयाच्या विस्तारामुळे तिबेटवर नवीन संकट उभे ठाकले आहे. भूगर्भ हालचालीचा परिणाम हिमालयावर होत असून हिमालयाच्या वाढत्या आकारामुळे तिबेटचे दोन तुकडे होण्याची भीती भूगर्भ संशोधकांनी व्यक्त केली आहे.
हिमालयाखालील कॉन्टिनेन्टल प्लेट्सचे तुकडे हळूहळू वेगळे होत असून त्यामुळे तिबेटचेही दोन तुकडे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या वार्षिक बैठकीत सादर प्री-प्रिंट संशोधनानुसार, जगातील सर्वात उंच पर्वताखालील भूगर्भ हालचाली पूर्वीपेक्षा अधिक जटिल होत असून भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळत आहेत;
ज्यामुळे हिमालयाचा आकार वाढत आहे. महासागर आणि महाद्वीपीय प्लेट्सच्याही घडका होत असून त्याचाही परिणाम पृथ्वीवरील भूभागांवर होत असल्याची कल्पना भूगर्भ शास्त्रज्ञांना आली आहे. परंतु जेव्हा दोन खंडीय प्लेट्स एकमेकांना धडकतात, तेव्हा या घटनेच्या परिणामांचा अंदाज बांधणे कठीण असते.
अशा परिस्थितीत भारतीय प्लेटचे आतील ‘भाग कमी होत आहेत आणि वरचे भाग तिबेटच्या मोठ्या भागांवर दाबले जात आहेत. नवीन संशोधनानुसार, भारतीय प्लेट कमी होत असल्या तरी त्या वाकण्याच्या अथवा फुटण्याची शक्यता असते. त्याचा वरचा अर्धा भाग एखाद्या डब्याच्या झाकणाप्रमाणे उघडलेला असतो.
या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी भूकंपाच्या लहरींचे परीक्षण केले, जेथे दोन प्लेट्स आदळतात. या लहरींचा वापर करून त्यांनी भारतीय प्लेट क्रस्टच्या स्लॅबमध्ये तडे दर्शवणारी प्रतिमा तयार केली आहे. यात काही ठिकाणी भारतीय प्लेटच्या खालचा भाग दोनशे किमी खोल आहे, तर काही ठिकाणी तो केवळ शंभर किमी खोल आहे.
यावरून भारतीय प्लेटचा काही भाग वर आल्याचे दिसून येते. दरम्यान, या अभ्यासात २०२२ मध्ये, संशोधकांनी हिमालयात जिथे दोन प्लेट्स एकत्र येतात, त्या सीमा शोधण्यासाठी या प्रदेशातील भू-औष्णिक स्प्रिंग्समधील हेलियम बबलमधील फरक मोजण्याचाही प्रयत्न केला होता. त्यातून काही निष्कर्ष मांडण्यात आल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.