स्पेशल

सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली ! खाद्यतेलाच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्यात; सूर्यफूल, पामतेल आणि सोयातेलाचे नवीन दर पहा….

Published by
Tejas B Shelar

Edible Oil Price Rate Increased : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने त्रस्त झाली आहे. सर्वसामान्यांना महागाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असून यामुळे सरकारच्या विरोधात सर्वसामान्य जनतेत मोठ्या प्रमाणात संतापाची लाट सुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र सरकारच्या उपायोजना महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत.

दरम्यान महागाईने होरपळलेल्या जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे भाव तब्बल 30 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांची फोडणी महाग झाली असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागत आहे.

अन्न, वस्त्र अन निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, पण वाढत्या महागाईमुळे या मूलभूत गरजा देखील आता पूर्ण करताना अगदीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे भाव स्थिर होते मात्र दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढीचा ट्रेंड आला.

बाजारातील अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने आणि केंद्रातील सरकारने 20 टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याने खाद्यतेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे मात्र या निर्णयामुळे तेलबिया पिकांचे भाव थोडेसे वाढले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना निदान पिकासाठी आलेला खर्च तरी सध्या भरून काढता येत आहे.

यामुळे शेतकरी बांधव समाधानी असून खाद्य तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने इतर काही उपाययोजना कराव्यात पण तेलबिया पिकांचे भाव पडतील असा निर्णय शासनाने घेऊ नये, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तज्ञ म्हणतात की, सरकारने खाद्यतेल आयातीसाठी 20% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठातून खाद्यतेलाची आवक कमी झाली.

यामुळे तेलाचे दर वाढले आहेत. दोन वर्षांपूर्वी तेलाच्या दराने उच्चांक गाठला होता, मात्र हळूहळू तेलाचे दर पूर्ववत झाले होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून तेलाचे दर स्थिरावले होते. परंतु आता पुन्हा तेलाच्या दराने उसळी घेतली आहे. आता आपण खाद्यतेलाचे जुने आणि नवे दर नेमके कसे आहेत हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

खाद्यतेलाचे नवे दर

देशात खाद्यतेलाच्या किमती जवळपास 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सर्वाधिक वाढ ही पाम तेलात झाली आहे. पामतेल तसेच सोयाबीन तेलातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचे दर देखील किलोमागे वीस रुपयांनी वाढले आहेत. सूर्यफूल तेल हे आधी 120 रुपये प्रति लिटर या दराने विकले जात होते मात्र आता हे भाव 140 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचले आहेत.

पामतेल आधी शंभर रुपये प्रति लिटर या दराने विकले जात होते मात्र सध्या स्थितीला पामतेल 135 ते 140 रुपये प्रति लिटर या भावाने बाजारांमध्ये विकले जात आहे. सोयाबीन तेल आधी 115 ते 120 रुपये प्रति लिटर या दरात विकले जात होते सध्या स्थितीला मात्र हे तेल 130 ते 135 रुपये प्रति लिटर या भावाने विकले जात आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com