स्पेशल

Eucalyptus Farming : निलगिरी लागवड करताय का? थांबा ! आधी त्याचे तोटे तर पाहा ; पैशांच्या गडबडीत जमीन जाईल वाया

Published by
Ajay Patil

Eucalyptus Farming : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. सध्या शेतकरी बांधव झाडांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड आपल्या वावरात करत आहेत. यामध्ये सागवान, चंदन अगदी निलगिरी चा देखील समावेश होतो. मात्र निलगिरी लागवड करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते. तज्ञ लोकांच्या मते निलगिरी लागवड निश्चितच शेतकऱ्यांना ठराविक कालावधीत लाखोंचे उत्पन्न मिळवून देणार आहे.

मात्र, असे असले तरी या झाडाचे काही दुष्परिणाम देखील पाहायला मिळाले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण निलगिरी लागवड केलेल्या तसेच करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निलगिरी झाडाची लागवड केली तर काय दुष्परिणाम होतात याची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

खरं पाहता निलगिरी लागवड केल्यानंतर अवघ्या पाच वर्षात या झाडाचे लाकूड काढण्यासाठी तयार होते आणि शेतकऱ्यांना लाखोंची कमाई होते. या झाडाच्या पानापासून ते लाकडांपर्यंत सर्वांचाच उपयोग होत असतो. लाकूड फर्निचर उद्योगात उपयोगात येत असल्याने याला बऱ्यापैकी दर मिळतो. विशेष म्हणजे निलगिरी पासून तेल बनवतात जे की बाजारात चांगल्या दरात विकलं जात, यामुळे निश्चितच याला बाजारात मागणी देखील आहे.

मात्र एक्सपर्ट सांगतात की, हे झाड जमिनीतील पोषकद्रव्ये झपाट्याने शोषून घेते, त्यामुळे मातीची रचना बिघडते. जमीन कोरडी आणि नापीक बनण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. विशेष म्हणजे या झाडाला इतर झाडांच्या तुलनेत अधिक पाणी लागते. एका अंदाजानुसार हे झाड दररोज 12 लिटर पाणी पिते तर सामान्य प्रजातींची झाडे दररोज 3 लिटर सिंचन देऊन जगवली जाऊ शकतात. साहजिकच पाण्याचा या झाडासाठी अधिक वापर होतो विशेष म्हणजे सिंचनाची सोय नसल्यास या झाडाची मुळे जमिनीतील पाणी शोषून घेण्यास सुरुवात करतात.

यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा लक्षणीय कमी होत असतो. ज्या ठिकाणी निलगिरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे त्या ठिकाणी भूजल पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्याचा धक्कादायक असा अहवाल देखील समोर आला आहे. यामुळे निलगिरी लागवडीमुळे कुठे ना कुठे पर्यावरणावर विपरीत असा परिणाम पाहायला मिळत आहे. दरम्यान शेतकरी बांधवांनी यातून चांगले उत्पन्न विशेष म्हणजे विपरीत हवामानात देखील उत्पन्न मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात निलगिरीची लागवड सुरू केली आहे.

मात्र काही पैशांसाठी शेतकरी बांधवांची करोडो रुपयांची सुपीक जमीन नापीक होण्याचा धोका यामुळे आता वाढला आहे. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांना निलगिरी लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात किंवा इतर दलदलीच्या ठिकाणी याची लागवड करावी. मात्र मुख्य शेतात तसेच शेताच्या बांधावर, सुपीक शेत जमिनीत या पिकाची कदापि शेती करू नये असा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे.

Ajay Patil