Marathi News : युक्रेनमध्ये रशियाने छेडलेल्या युद्धामुळे सुरुवातीला अनेक भागांतील नागरिकांनी युरोपात सुरक्षित आसरा शोधला. युद्धाचा निर्णायक निकाल लागला नसताना आणखी अनेकजण मिळेल त्या मार्गाने युद्धभूमी सोडत आहेत.
रोमानियाच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाने एका तरुणाला पकडले. स्त्री वेशातल्या या तरुणाने बहिणीच्या पासपोर्टवर देश सोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
युद्ध सुरू झाल्यानंतर देशातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे पलायन सुरू झाल्यानंतर युक्रेनच्या संसदेने कायदा संमत केला. त्यानुसार, १८ ते ६० वयाच्या कुठल्याही नागरिकाला देश सोडून जाता येणार नाही. त्याने लष्करात नाव नोंदवावे आणि रशियाशी दोन हात करावे. झोलोटोनोशा येथील तरुणाला देश सोडायचा होता, परंतु देशासाठी लढायचे नव्हते.
त्यामुळे त्याने महिलांचा वेश परिधान केला. डोक्याला महिलांसारखा दिसेल असा विग लावला, केस पांढऱ्या हातरुमालाने बांधले, काळ्या रंगाचा घोट्यापर्यंत येईल असा स्कर्ट आणि अंगावर टी-शर्ट चढवला. बेईड्रोन्का येथील सुपरमार्केटमधून त्याने या साऱ्या स्त्री साहित्याची चोरी केली. रोमानियाच्या सीमेवर तो संशयास्पद हालचालींमुळे सुरक्षा रक्षकांच्या नजरेत आला. त्याला ताब्यात घेतले.
त्यावेळी त्याच्या अंगावरची स्त्री वेशभूषेतली साधने गळून पडू लागली. त्यामुळे तपासणी करण्यात आली. त्यात स्त्री वेशातला तो तरुण असल्याचे दिसले. त्याच्याजवळ बहिणीचा पासपोर्ट मिळाला. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूपच लाईक्स मिळाले आहेत. काहींनी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे म्हटले तर काहीजणांनी राष्ट्र कर्तव्य अगोदर अशी प्रतिक्रिया देत पळपुट्या तरुणाचा धिक्कार केला.