अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- देशात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे अक्षरश कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ सुरुच असून आज १ डिसेंबरपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
यामुळे मोठा आर्थिक फटका नागरिकांना बसणार आहे. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या महिन्यात ऐन दिवाळीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात २६६ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
म्हणजेच दोन महिन्याच्या आत व्यावसायिक गॅसच्या किंमतीमध्ये ३६६ रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार अशी नागरिकांची अपेक्षा होती, परंतु नागरिकांच्या या अपेक्षेला आज झटका बसला आहे.
नव्या दरानुसार दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत २१०० रुपये झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ती १७३३ रुपये इतकी होती.
मुंबईमध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २०५१ रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकातामध्ये २१७४.५० रुपये तर चेन्नईमध्ये २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर उपाहारगृहातील खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.