गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळ वारे, गारपीट, अतिवृष्टी किंवा हवामान बदल आणि जास्तीची उष्णता इत्यादींमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व याला फळ पिके देखील अपवाद नाहीत.या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीमुळे जे काही नुकसान होते त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.
अशा प्रकारच्या आर्थिक नुकसानी मध्ये शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक हातभार लागावा म्हणून पिकविमा योजना आणि फळ पिकविमा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेमध्ये पिकांचा विमा काढल्यानंतर जर नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.
यामध्ये महत्त्वाचे असलेली प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना ही महत्त्वाची योजना असून ही योजना सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षांमध्ये आता राज्य शासनाने राबवायला मान्यता दिलेली आहे.
या योजनेमध्ये आता मृग आणि आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा भरून शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे.
फळपीक विम्याची मुदत वाढवली
राज्यामध्ये फळ पिक विमा योजना ही बजाज आलियांस, फ्युचर जनरल, भारतीय कृषी विमा कंपनी आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार कंपन्यांच्या मार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे.
या मृग बहारामध्ये द्राक्ष, काजू, संत्रा, पेरू आणि लिंबू या चार फळ पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत ही 25 जून निश्चित करण्यात आलेली आहे व त्यासोबतच मोसंबी व चिकू करिता 30 जून, डाळिंब फळा करिता 14 जुलै तर सिताफळ पिकासाठी 31 जुलै ही मुदत निश्चित करण्यात आलेली आहे.
या हंगामात या पिकांचा फळ पिक विमा योजनेत करण्यात आला नवीन सहभाग
या हंगामामध्ये राज्यात संत्रा, डाळिंब, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सिताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, स्ट्रॉबेरी आणि काजू इत्यादी पिकांचा या फळ पिक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे.
तसेच 2024 ते 26 या दोन वर्षात राबविण्यात येणाऱ्या या फळपीक विमा योजनेचे स्वरूप तसेच विमा संरक्षण रक्कम इत्यादीची सविस्तर माहिती कृषी विभागाकडून जारी करण्यात आली असून त्यानुसार शेतकऱ्यांनी विहित मुदतीमध्ये आपला विमा भरून घेण्याचे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
त्यामुळे या वाढलेल्या मुदतीचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याची गरज आहे.