अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे दोन दिवसांपूर्वी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या जवळ पोहोचले होते. परंतु शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे अंबानी या रेसमध्ये पुढे निघून गेले आहे.
दोघांच्या नेटवर्थमध्ये आता १३ अब्ज डॉलर्सचं अंतर झालं आहे. दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या नव्या कोरोनाचा धोका वाढला आहे. त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर झाला आहे.
शुक्रवारी जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. भारतही त्याला अपवाद नव्हता. BSE सेन्सेक्स 1,688 अंकांच्या प्रचंड घसरणीसह बंद झाला.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच गौतम अदानी हे मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थच्या अगदी जवळ पोहोचले होते. परंतु शुक्रवारी त्यांच्या नेटवर्थमध्ये १२.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ९३,०६५ कोटी रूपयांची घसरण झाली.
यामुळे अदानी हे सध्या या रेसमध्ये मागे पडले आहेत. अदानी यांची नेटवर्थ आता ७८.१ अब्ज डॉलर्स इतकी राहिली आहे. तसंच जगातील श्रीमंतांच्या यादीत ते १३ व्या क्रमांकावर आहेत.
यावर्षी त्यांच्या एकूण नेटवर्थमध्ये ४४.३ अब्ज डॉलर्सची तेजी आली आहे. अंबनी यांचं नेटवर्थ ९१.१ अब्ज डॉलर्स आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी हे ११ व्या स्थानावर आहे.
गुरूवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये ६.१० टक्क्यांची तेजी दिसून आली होती. परंतु शुक्रवारी झालेल्या घसरणीचा परिणाम रिलायन्सच्या शेअर्सवरही दिसून आला होता. यामुळे अंबनींच्या नेटवर्थमध्ये ३.६८ अब्ज डॉलर्सची घसरण झाली.